अंडा मसाला

गोव्याचे कवी, निवेदक म्हणून ओळखले जाणारे परेश नाईक लिहितात त्यांनी केलेल्या पाककृतीविषयी...

Story: ‘स्वयं’पाक |
20th June 2021, 06:15 pm
अंडा मसाला

तसा किचनचा आणि माझा संबंध अजिबात नाही. असल्यास केवळ योगायोग समजावा. किंबहुना जर घरातले धडधाकट रहायला हवे असतील तर माझ्यासारख्याने केवळ पुस्तकं चाळावी, नाटकं ढवळावी, कविता रांधाव्यात, फेसबुक व्हॉट्सऍपवर स्टेटस वाढावेत,  फार फार तर इतरांच्या साहित्याचा किस काढावा किंवा चिरफाड करावी (हे सगळं तरी धड कुठे जमतं?) पण किचनमध्ये जाऊ नये. माझा आणि किचनचा संबंध कधीकधी चहा पुरता येतो. शिरा, सॅन्डविच, भजी असं वर्षातून एखादवेळेस. पापड तळणे, पुऱ्या तळणे, चपाती भाजून घेणे (लाटल्या तर त्याला नकाशे म्हणतात) इ. कामं अधुनमधून करतो; पण "गिळणे" हा आवडीचा विषय असल्याने तिथे मात्र मी रमतो. 

मुळात आई सुग्रण असल्याने आपण उगाच दुधात मीठ का व्हायचं? असा प्रश्न मला पडतो आणि मी गप्प बसतो. पण अनेक असे क्षण आयुष्यात आले जेव्हा मी काही न काही बनवलंय. आणि घरातल्या माणसांनी ते आवडीनं खाल्लंय. सगळे धडधाकट राहिले हे विशेष आणि मी कौतुकास पात्र ठरलो. वर म्हटलेल्या क्षणांमधून अशाच एका गमतीदार क्षणाचा अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. 

माझ्या व्यावसायिक आयुष्यातली ७-८ वर्षं हॉटेलच्या नोकरीत गेली. पण तिथे काम करत असलो, एक्झेक्युटिव्ह डाईनिंग रूममध्ये जेवत असलो तरी घरून डबा न्यायचो ज्यावर सहकारी तुटून पडायचे. आईकडून फिश करीची रेसिपीसुद्धा त्या फोर स्टार हॉटेलला दिली होती. पण एक दिवस आमचे मॅनेजर साहेब म्हणाले "तुम गोवा के लोग, गोवन खाना छोडके और कुछ बनाही नही सकते हो" हे ऐकून माझ्यातला सुशेगातपणा गळून पडला आणि त्या दिवशी मॅनेजर साहेबानी खाल्लं "अंडा मसाला" (तिथल्याच एका शेफने शिकवलेलं)

साहित्य 

६ अंडी, १ लहान व २ मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरलेले, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, १ मोठा टोमॅटो चिरलेला, धनेपूड, जीरेपूड, कसुरी मेथी, जीरे, प्रत्येकी १ टेबलस्पून, लाल तिखट व गरम मसाला प्रत्येकी २ टेबलस्पून, १ इंच दालचीनी स्टिक, १ तमालपत्र, २ टीस्पून हळद, ८ - १० काजू, फ्रेश क्रीम, तेल, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाणी

कृती : 

१. प्रथम अंडी उकडून घ्यावी व उकडलेल्या अंड्याची सालं काढून अंड्याना ३ - ४ उभे कट द्यावे. २. लहान कांदा बारीक चिरून घ्यावा व मोठ्या कांद्याला उभे चिरून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. ३. चिरलेला टोमॅटो आणि काजूची एकत्र पेस्ट करून घ्यावी. ४. एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ घालून, कट दिलेली अंडी चांगली तळून घ्यावी व एका भांड्यात काढून घ्यावी. ५. त्यानंतर कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करून जीरे घालून तडतडू द्यावे, त्यात दालचिनी व तमालपत्र घालून बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. ६. त्यानंतर त्यामध्ये कांद्याची पेस्ट घालावी. थोडेसे परतून आले-लसणाची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतावे.

७. त्यानंतर हळद, लाल तिखट, धनेपूड जिरेपूड, गरम मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यावे आणि नंतर टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून पुन्हा चांगले परतून घ्यावे. ८. ग्रेव्हीमध्ये चवीनुसार मीठ घालून तळून घेतलेली अंडी अलगद त्यात सोडावी व हलक्या हाताने परतून घ्यावे. साधारण एक कप पाणी घालून कढईवर झाकण लावून एक उकळी येऊ द्यावी. ९. शेवटी त्यावर कसुरी मेथी चुरडून घालावी.  फ्रेश क्रीम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून गार्निशसाठी घालावी. १०. नान, रोटी, पराठा किंवा राईस बरोबर खायला तयार आहे अंडा मसाला.