जनात एक मनात एक

"खेड्यातील लोकच मागासलेले असतात असे म्हणता येणार नाही. मानसिक मागासपणा उच्चशिक्षित आणि प्रागतिक म्हणवणाऱ्यातही असू शकतो. फरक एवढाच, ते कृती करतात अविचाराने; आणि हसे करून घेतात आपले आणि आम्ही मात्र ढोंगीच असतो,जनात एक आणि मनात एक करणारे”

Story: मिश्किली | वसंत भगवंत सावंत |
20th June 2021, 05:59 pm
जनात एक मनात एक

“असं आपण म्हणतो खरं, पण खंत असतेच मनात कुठेतरी. आपण प्रागतिक व्हायलाच पाहिजे हे मान्य आहे मलाही. पण…"मी जरासा हबकलो आणि हेलावलोही मित्राच्या या शब्दांनी. हा आमचा शेजारी मित्र, नेहमी मनमोकळेपणाने बोलतो माझ्याशी.‘मॉर्निंग वॉक’ च्या निमित्ताने गट्टी जमली आहे माझी या स्पष्टवक्त्याशी. काहीही सांगण्याची उबळ आली की सरळ घरी यायचा आमच्या.कोविड काळात घरात येणे जाणे नसले तरी गेट जवळ चालते आमचे चर्चासत्र.एकच खोड आहे मात्र त्याला, ज्या मुद्द्याच्या समर्थनात बोलणे सुरु करतो नेमकी विरोधी भूमिकाही घेतो कधीकधी; आणि मनातलं बोलून जातो.

परवाही तसंच झालं. गेटची कडी वाजविल्याचा आवाज झाल्याने मी बाहेर आलो. हातातलं वर्तमानपत्र माझ्याकडे फेकत म्हणाला, हे वाचलंस काय ? “शेवटी काय मिळवले त्या मुर्ख बाईने, मुलाची चोरी करून ? सापडलीच शेवटी आणि पोलीस कोठडीत जाऊन बसावे लागलेच ना ? आता ते चोरलेलं मुलही नाही; आणि हक्काच्या मुलीही नाहीत जवळ. मुलगाच हवा हा हव्यास कोणत्या थरास पोहचवतो माणसाला बघ तू! कधी ही मागासलेली  विचारसरणी बदलायची परमेश्वरच जाणे!फक्त मुलीच पदरी असलेली ही एकटीच आहे काय या जगात?"उलट सुलट प्रतिकिया ऐकून-वाचून घुस्मट झाली होती मित्राची.

“वंश वाढावा म्हणून पुत्रप्राप्तीची इच्छा बाळगणे तसे स्वाभाविक आहे म्हणा,पूर्वीच्या काळी आठ-दहा मुले जन्माला घालायची प्रथा होती खरी.पाच- सहा पोरी जन्मल्या तरी एक दोन मुलगेही असायचे कुटुंबांत.पण 'दोनच पुरे' च्या जमान्यात तशी अपेक्षा कशी बरे धरता येईल?म्हणून म्हणतो, झाल्याच दोन्हीही मुली तर मुलांचाच दर्जा द्यावा त्यांना. तसे पुत्र पिता म्हणून मिरवणाऱ्या बापांच्या व्यथा काही कमी आहेत का?किती उदाहरणे देऊ तुला पस्ताव्याची, आपल्याच भोवती असलेली? शेजारी राहणाऱ्या  गुरुजींशी बोलला आहे का तू कधी, या विषयावर?किती पैसा उधळला त्यांनी आपल्या एकुलत्या मुलाच्या शिक्षणावर? परदेशी शिक्षण घेण्याचा हव्यासही केला पूर्ण, पदरची पुंजी खर्चून. निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीचाच आधार हे त्यांनाही माहीत होते. पण या वंशाच्या दिव्याने काय उजेड पाडला आहे तो पाहिलाय ना? नोकरीच्यानिमित्ताने अमेरिकेत स्थायिक झाला तो कायमचा. लग्नही झाले आहे म्हणे, कुठल्या तरी दुसऱ्याच देशातील मादमशी. आता वर्षातून एक-दोनदा फोन करण्याचे कर्तव्य निभावतो तेवढेच. बापाची आर्थिक परिस्थिती कशी आहे? याचे सोयरसुतक नाही त्याला आणि विनवणी करण्याची स्वाभिमानी गुरुजींचीही तयारी नाही.त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो हे आपणाला अप्रूप वाटते तेवढंच. गुरुजीना सांगितलं मी एकदां सरळ... तुम्हीच चूक केली म्हणून दिलं पटवून! विदेशात शिक्षणास  नसता केला खर्च, तर गाठीशी काही तरी वाचलं असतं आणि वंशाचा दिवाही राहिला असता, आपल्या जवळ, म्हातारपणात.शेवटी त्यांच्या  पदरी काय? तर वृद्धपणातील आरोग्य सांभाळताना ओढताणच ना? आपल्या गांवच्या भाटकारांच्या नशिबी शेवटी काय आलं? चार पुत्र असलेले जमीन - जुमला, संपत्तीच्या वाटणीवरून कोणत्या थरावर गेले सगळे ? शेवटी याच वंशाच्या दिव्यांच्या मनस्तापाने आत्महत्या करण्याची पाळी आली ना? निपुत्रिक राहिले असते तर समृद्धपणे म्हातारपणही भोगले असते निश्चित. वृद्धाश्रमात जाऊन बघितलंय का कधी? पुत्र पदरी असलेलेच सापडतील आईबाप. मुली लग्न होऊन सासरी जातात खऱ्या, पण जन्मदात्यांना विसरत नसतात कधी. वंशाचा दिवा  मात्र बहुतांशी बायकोचीच बाजू घेतो,मग नशिबी भोग यायचेच. माझी आई तर नेहमी म्हणायची, मुलाचे काही सांगता यायचे नाही. आई गेल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी येईलच याची खात्री नसते मुळी. पण सासरी गेलेली लेक मात्र खात्रीने रडत येईल, शेवटची नजर टाकायला. आपलं दहन करायला तरी पुत्र पाहिजे म्हणायचे जुन्या पिढीतले लोक. कन्येनेच शेवटचे विधी केल्याची कित्येक उदाहरणे आहेतच की आपल्या गोव्यातही. म्हणूनच म्हणतो, मुलगीच पदरी असली म्हणून कुढत राहण्याची गरज नाहीच मुळी. "

"आता माझच उदाहरण घे ना, मलाही आहे एकुलती एक लेक. पण मुलगी अशा भावनेने बघितलंच नाही आम्ही कधी, तिलाही वाटू दिलं नाही.मुख्य म्हणजे मुलगा असलाच पाहिजे हा अट्टाहासही केला नाही कधी. " बोलता बोलता मित्र गंभीर झाला थोडासा; आणि भावुकही. म्हणाला, ''खरं तर आपला समाजच जबाबदार असतो अशा मनोवृत्तीस. मुलगा नसलेली बाई म्हणजे मुल नसलेली बाई अशी कुचंबणा येते वाट्याला. त्यावेळी आपली मनस्थिती काय होते ते भोगणाऱ्यालाच कळायचे. मालमत्ता आणि उत्तरदायित्व या भावनेनेच बघतो आम्ही आपल्या संततीकडे.मुलगा हा ‘एसेट’ आणि मुलगी‘लायबेलीटी” असाच समज आहे आपल्या समाजात. मुलगीही स्वतंत्र असावी म्हणतो खरं, पण अपेक्षाही भारी ठेवतो त्यांच्याकडून. आईबापाची इज्जत मुलीच्या हाती, हिच भ्रांत  घेऊन जगत असतो नेहमी. मुलीचे लग्न डोईजडच होत असते काहीजणांना. त्यात चार मुली म्हणजे कहरच!"

"एक काळ होता, पहिली बेटी धनाची पेटी म्हणायचो आपण. आजच्या युगांत मात्र, पहिलाच मुलगा झाला तर सुटलो अशी भावना.'दुसरीही मुलगीच झाली तर?'या प्रश्नाने मलाही भेडसावले होते त्या वेळी.मी प्रागतिकता जोपासणारा खरा, पण माझ्याही मनात तो विचार येऊन गेलाच की! म्हणून म्हणतो, आपण विचार सुधारणेचे मांडतो नेहमी, पण अंतर्मनाचे काय?त्या अर्थाने खेड्यातील लोकच मागासलेले असतात असे म्हणता येणार नाही. मानसिक मागासपणा उच्चशिक्षित आणि प्रागतिक म्हणवणाऱ्यातही असू शकतो. फरक एवढाच, ते कृती करतात अविचाराने; आणि हसे करून घेतात आपले आणि आम्ही मात्र ढोंगीच असतो,जनात एक आणि मनात  एक करणारे”

वर्तमानपत्र न घेताच मित्र निघाला आपल्या घराकडे, विमनस्क मनस्थितीत.मी मात्र हबकलोच आणि हेलावलोही, त्यांच्या मनस्थितीचा अंदाज येऊन...