ऑनलाईन तर ऑनलाईन...

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता याला प्राधान्य देत यावर्षीही करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीनेच २१ तारखेपासून राज्यातल्या शाळा सुरु होत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते आहे ही आनंदाची बाब.

Story: वेध | डाॅ. गीता गवस-येर्लेकर |
20th June 2021, 05:56 pm
ऑनलाईन तर ऑनलाईन...

करोना महामारीने आपल्या आयुष्यात आणि समाजजीवनात आमूलाग्र बदल आणला. आपली जीवनशैली जशी बदलली तसेच पारंपरिक अनेक संदर्भही बदलले. त्यातलाच एक महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाईन शिक्षण. खरंतर हा बदल एरवी आपण इतक्या जलद गतीने स्वीकारला असता का? हा प्रश्नच होता. पण या काळाने आपल्यापुढे कोणताच पर्याय ठेवला नाही त्यामुळे गरजेपोटी आपण पहिल्यांदाच हे अनुभवलेही आणि स्वीकारलेही. करोना काळाने पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करत नवी शिक्षणपद्धती स्वीकारायला भाग पाडले. 

गेल्या वर्षी मुलांनी ऑनलाईन शिक्षणाचा पहिल्यांदाच अनुभव घेतला तोच कित्ता त्यांना यंदाही गिरवावा लागणार. गेले वर्ष या नव्या शिक्षण पद्धतीत शिक्षक, पालक आणि मुलं या सगळ्यांसाठीच संभ्रम निर्माण करणारे होते, अनेक प्रश्न होते. सगळ्याचीच उत्तरे सापडली असे नाही; पण ती शोधण्यासाठी शासन, शिक्षणव्यवस्था, शिक्षक या सगळ्यांचीच धडपड मात्र निश्चित सुरु आहे. काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावे लागले. याही परिस्थितीत न थांबता पुढे जायचे आहे हे आपण शिकलो एवढे मात्र नक्की. 

यापूर्वी ऑनलाईन शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा होता. आज आपल्या वर्तमान स्थितीत नव्या पिढीचे भविष्य घडविण्यासाठी ही पद्धत आपला आधार बनली आहे. हे सगळे यापूर्वी आपण अशातऱ्हेने कधीच अनुभवले नव्हते आणि आता हे प्रत्यक्ष अनुभवण्याशिवाय गत्यंतर नाही अशी आपली स्थिती झाली आहे. कोणताही पर्याय जेव्हा नसतो तेव्हा अवघड वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा सोप्या आणि सहज वाटायला लागतात. या सगळ्या बदलांचा परिणामकारकपणे विचार करत, तिला तितक्याच समर्थपणे नव्या पिढीपर्यंत पोहचवणे हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. गेले वर्ष हे बदल समजून घेण्यातच गेले पण आता मुलभूत असा विचार अपेक्षित आहे तसाच तो रुजवणे हेही तितकेच गरजेचे आहे.

काळाबरोबर आपण या नव्या शैक्षणिक बदलांना स्वतःत सामावून घेत आहोत. यासगळ्या प्रक्रियेत महत्त्वाचा किंबहुना केंद्रस्थानी असणारा घटक म्हणजे मुलं. या घटकाचा विचार करत ऑनलाईन अध्ययनाकडे मुलांचा कल, त्यांची मानसिकता आणि हे सगळं ते कसे स्वीकारतात याचा अंदाज घेत बदल स्वीकारणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. मुलं समाधानी आहे की नाही हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. साहजिकच या पद्धतीच्या काही मर्यादा असल्या तरी शेवटी मुलांची ज्ञान मिळविण्याची असोशी वृद्धिंगत कशी होईल या गोष्टींचा विचार तर करावा लागणार आहे.

ऑनलाईन शिक्षण हळूहळू आपल्या अंगवळणी पडतंय खरं पण त्यातले गांभीर्यही सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. मुलांच्या मनात कोणताही न्यूनगंड निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर भर द्यावा लागेल. मुलांशी आपला संवाद कृत्रिम होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. मुलांना बोलते करणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या मनात काय चाललं आहे हे ओळखणं गरजेचे आहे. कधीही एका जागेवर न बसणारी मुले गेले वर्षभर आणि आताही एकाच ठिकाणचं आयुष्य अनुभवत आहेत. शारीरिक कसरत, सवंगड्यांसोबत खेळणं या गोष्टींपासून ती वंचित आहेत. अशात बाहेरच्या वास्तवाने तीही एका भीतीच्या आणि साशंकतेच्या वातावरणाला सामोरी जात आहेत या सगळ्याचा त्यांच्या मनावर जो परिणाम होत आहे तो आपल्याला नजरेआड करता येणार नाही. प्रत्येक मुल वेगळ्या परिस्थितीत वाढते याची जाणीव ठेवून ज्ञानाची कवाडं खूली करावी लागतील. तसेच या पिढीला योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी आपण सगळेच बांधिल आहोत याचे भानही सतत ठेवावे लागेल. 

सद्यपरिस्थितीचा सखोल विचार करणे गरजेचे आहे....शेवटी आपल्याला कोणत्याही परिस्थितीला सक्षमपणे सामोरी जाणारी पिढी घडवायची आहे. ऑनलाईन तर ऑनलाईन पण या सगळ्याचा तितक्याच गांभीर्याने विचार करत सक्षमतेच्या दिशेने सक्षम अशी पिढी घडविण्यासाठी वाटचाल करुया.