वीस वर्षीय भारतीय नित्शाचा इस्रायल सैन्यात पराक्रम

इस्रायल

Story: विश्वरंग । सुदेश दळवी |
19th June 2021, 12:37 am
वीस वर्षीय भारतीय नित्शाचा इस्रायल सैन्यात पराक्रम

हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये अलीकडेच अकरा दिवस जोरदार संघर्ष सुरू होता. हमासकडून झालेल्या हल्ल्यांना इस्रायलच्या सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. त्यांच्यातला संघर्ष चिघळल्यामुळे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर अकरा दिवसांनी अखेर शस्त्रसंधी झाली आणि हल्ले थांबले. मात्र, ही शांतता जेमतेम महिनाभर टिकली. त्यानंतर पॅलेस्टाईनच्या एन्क्लेव्हमधून इस्रायलच्या सीमावर्ती भागांत आग लावणारे फुगे सोडण्यात आले. मंगळवार, दि. १५ जून रोजी रात्री इस्रायलने गाझा पट्टीतल्या हमासच्या तळांवर हवाई हल्ले केले. या युद्धात इस्रायलच्या सैन्याचा भाग असलेल्या अवघ्या २० वर्षांच्या नित्शा मुलियाशा या तरुणीच्या नावाची विशेष चर्चा होत आहे. वीस वर्षांची नित्शा मूळची गुजराती आहे आणि इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या टीममध्ये सहभागी आहे. गाझा पट्टीत पुन्हा हल्ले सुरू करण्यात तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.       

राजकोटमधल्या मनावदार तालुक्यातील कोठाडी हे नित्शाचे मूळ गाव आहे. सध्या ती इस्रायलच्या तेल अवीव शहरात राहत असून, इस्रायलच्या सैन्यात भरती होणारी ती पहिली गुजराती मुलगी आहे. इस्रायलच्या शिक्षणव्यवस्थेमुळेच आपली मुलगी आज सैन्यात पराक्रम गाजवत असल्याचे नित्शाचे वडील जीवाभाई यांनी सांगितले. इस्रायलमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच नित्शाला इस्रायलच्या सैन्याची परीक्षा देण्याची संधी मिळाली. त्या परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण आणि सुविधा तिला देण्यात आल्या. त्यानंतर तिची सैन्यात निवड झाली. इस्रायलच्या सैन्यासोबत नित्शाचा २.४ वर्षांचा करार झाला आहे. तेवढ्या कालावधीत तिला सैनिक म्हणून जबाबदारी निभावणे आवश्यक आहे. त्यानंतर तिच्याशी पाच किंवा दहा वर्षांचा शैक्षणिक करार केला जाणार आहे. त्याअंतर्गत तिला तिच्या योग्यतेनुसार इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा आपल्या आवडीचे अन्य शिक्षण घेता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे तिच्या या उच्च शिक्षणासाठी होणारा सगळा खर्च सैन्याकडून केला जाणार आहे. आपल्या मुलीच्या यशाबद्दल ही माहिती देताना जीवाभाईंचा ऊर भरून आला. आपल्याला तिचा अभिमान असल्याचे आणि तिची खूप आठवण येत असल्याचे ते सांगतात.      

नित्शा सध्या युद्धात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. तिच्या सैन्यविषयक प्रशिक्षण काळात तिला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर आणि युद्धाच्या आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या प्रशिक्षणाचा ती चांगला उपयोग करून घेत आहे. गेली दोन वर्षे नित्शा लेबॅनॉन, सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त या देशांच्या सीमेवर आपली जबाबदारी निभावत आहे. सध्या ती गश डान येथे तैनात असून, हमासच्या हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याचे इस्रायली सैन्याचे काम तिथून सुरू आहे.