कोव्हॅक्सिनचा अपप्रचार

भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल : लस भेसळ नसल्याचा खुलासा


17th June 2021, 01:01 am
कोव्हॅक्सिनचा अपप्रचार


नवी दिल्ली : कराेनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान राबवले जात आहे, त्याचा फायदाही दिसून येत आहे. मात्र, यामुळे दुखावलेली काँग्रेस कोव्हॅक्सिनबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार करून जनमानसात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे महापाप करीत असल्याचा आरोप बुधवारी भाजपाने केला.
कोव्हॅक्सिनमध्ये गायीच्या बछड्याचे रक्त (सीरम) असल्याचा आरोप काँग्रेसने बुधवारी एका ट्विटमधून केला होता. केंद्रीय औषधी प्रमाणीकरण नियंत्रण संस्थेने विकास पाटनी नावाच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला पाठवलेल्या पत्राचा हवाला देत काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे समन्वयक गौरव पांधी यांनी, असा आरोप केला होता. दरम्यान, भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, काँग्रेसने असा आरोप ट्विटर तसेच अन्य समाजमाध्यमातून केल्यावर कोव्हॅक्सिनमध्ये गाय वा गायीच्या बछड्याचे रक्त नसल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. कोव्हॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित असून, त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही.
काँग्रेसचे निराधार आणि खोडसाळ आरोप
कोव्हॅक्सिनमध्ये गायीच्या बछड्याचे रक्त नसल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तसेच देशातील शास्त्रज्ञांनीही केला आहे. या प्रकरणाला सांप्रदायिक वळण देण्याचा जो प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे, तो निषेधार्थ आहे, असे पात्रा यांनी सांगितले. लसीकरण अभियानाला छेद देण्यासाठी काँग्रेस असे निराधार आणि खोडसाळ आरोप करीत आहे. गांधी घराण्यातील नेत्यांनी करोनाची लस घेतली नाही आणि जनतेनेही ती घेऊ नये असा त्यांचा प्रयत्न आहे.

वेरो सेल बनवण्यासाठी गायीच्या बछड्याच्या रक्ताचा वापर केला जातो. कोणतीही लस बनवण्याची ती एक शास्त्रीय पद्धत आहे. मात्र, कोव्हॅक्सिनच्या अंतिम लसीत बछड्याच्या रक्ताचा उपयोग केला गेला नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते.