पारस यांच्या नावाचा फेरविचार करा

चिराग पासवान यांचे सभापती बिर्ला यांना पत्र


17th June 2021, 01:01 am
पारस यांच्या नावाचा फेरविचार करा

 चिराग पासवान      

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाच्या सांसदीय पक्षाचे नेते म्हणून पशुपतीकुमार पारस यांच्या नावाला मान्यता देण्याच्या आपल्या निर्णयाचा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी फेरविचार करावा, असे आवाहन लोजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केले आहे.
सभापतींनाबिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात चिराग पासवान यांनी म्हटले की, पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे सांसदीय मंडळ पक्षाच्या सांसदीय नेत्याची निवड करीत असते. पशुपतीकुमार पारस यांना लोजपाच्या सांसदीय मंडळाने पक्षाचा नेता निवडले नाही, उलट लोजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांना पक्षातून काढून टाकले आहे. त्यामुळे लोजपा सांसदीय पक्षाचे नेते म्हणून पारस यांच्या नावाला मान्यता देण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, तसेच माझ्या नावाला सांसदीय पक्षाचा नेता म्हणून मान्यता द्यावी, असे आवाहन चिराग यांनी केले.
मीच लोजपाचा अध्यक्ष; चिराग यांचा दावा
लोजपाचा अध्यक्ष मीच आहे. पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षपदावरून मला हटवले जाऊ शकत नाही, असा दावा चिराग पासवान यांनी नंतर पाटणा येथे एका पत्रपरिषदेत केला. अध्यक्षाने राजीनामा दिल्यानंतरच दुसऱ्या नेत्याची अध्यक्ष म्हणून निवड करता येऊ शकते. पक्षाच्या सांसदीय नेत्याची निवड करण्याचा अधिकार पक्षाच्या सांसदीय मंडळाला असतो. पक्षाचे खासदार सांसदीय पक्षनेत्याची निवड करू शकत नाही. जदयूने बर्‍याच काळापासून फोडाफोडीचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.