नवी आकडेवारी अधिक चिंताजनक

चोवीस तासांतल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद, बाधितांच्या संख्येतही वाढ


11th June 2021, 12:39 am
नवी आकडेवारी अधिक चिंताजनक

नवी आकडेवारी अधिक चिंताजनक

चोवीस तासांतल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद, बाधितांच्या संख्येतही वाढ

नवी दिल्ली : 

देशात करोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सध्या सुरूच आहे. ही लाट ओसरत असतानाच आता पुन्हा चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत झालेल्या मृत्यूंची संख्या ही एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे. देशातल्या दैनंदिन बाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  देशात गेल्या २४ तासात एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा तीन लाख ५९ हजार ६७६ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता १.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशातल्या दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात ९४ हजार ५२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे सध्या उपचाराधीन असलेल्या करोना रुग्णांचा आकडा आता ११ लाख ६७ हजार ९५२ वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात देशातले एक लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

देशात काल दिवसभरात ३३ लाख ७९ हजार २६१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी ३० लाख ६५ हजार ९५१ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, तीन लाख १३ हजार ३१० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ वर पोहोचली आहे.


----------------

-चौकट-

पॉझिटिव्हिटी रेट मध्येही घट

देशातील कमी होणार्‍या रुग्णसंख्येदरम्यान पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे. सध्या देशातील १५ राज्यातील संक्रमण दर ५% पेक्षा जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार, ५% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असेल, तर परिस्थिती नियंत्रणा असल्याचे म्हणता येत नाही. सध्या गोवा, केरळ, नगालँड, मेघालय, तमिळनाडू, सिक्किम, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, मणिपूर, कर्नाटक, पुड्डुचेरी, मिजोरम, लक्षद्वीप आणि महाराष्ट्राचा संक्रमण दर ५% पेक्षा जास्त आहे.

---------------