अट्टल चोराच्या मुसक्या मुंबईत आवळल्या

पणजी पोलिसांची कारवाई : दोनापावला येथून दागिने चोरल्याचा अारोप


06th May 2021, 11:55 pm
अट्टल चोराच्या मुसक्या मुंबईत आवळल्या

फोटो : मुंबई येथे ताब्यात घेऊन पणजीत आणलेल्या संशयित मोहम्मद इर्फान उर्फ रॉबिनहुड याच्यासोबत पणजी पोलिसांचे पथक.
__
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : येथील शहर पोलिसांनी मुंबई येथून अट्टल चोर मोहम्मद इर्फान उर्फ रॉबिनहुड (३२, रा. बिहार) याला अटक केली आहे. त्याच्याकडून २८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत.
पणजी पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, दोनापावला येथील एका बंगला मालकाने तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने २७ एप्रिल रोजी मध्यरात्री २.४५ ते ३.२५ दरम्यान भोजन कक्षाचा दरवाजा स्क्रु ड्रायव्हर वापरून तोडला आणि आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने बंगल्यात असलेल्या ३० लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने, तसेच इतर एेवज चोरी केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४५७ आणि ३८०अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.
पोलिसांना संशयित मुंबईत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तिथे पाठवले. त्या पथकाने बिहार येथील मोहम्मद इर्फान उर्फ रॉबिनहुड याला ताब्यात घेतले व गोव्यात आणले. येथे चौकशीअंती संशयिताला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक साहील वारंग, बाबलो परब, पोलीस हवालदार नितीन गावकर, हरीष पालेकर, विष्णू राणे, सागर नाईक, पोलीस शिपाई बाप्टीस्ट मास्केरेन्हास, तुषार नाईक, साईश उसकईकर, रामा घाडी, अमोल हट्टीकर आणि अमय हळर्णकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.