मडगावात कोविडबाधितांना बेड, ऑक्सिजनही मिळेना

रुग्णांची व्यथा : सरकारीसह खासगी इस्पितळांतील खाटाही फुल्ल


06th May 2021, 11:52 pm
मडगावात कोविडबाधितांना बेड, ऑक्सिजनही मिळेना

फोटो : केपे येथील सरकारी महाविद्यालयाच्या सभागृहात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. या कोविद केअर सेंटरमध्ये ३० खाटा या ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असलेल्या आहेत. तसेच महिला रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. शुक्रवारी या कोविड केअर सेंटरचा शुभारंभ केला जाणार आहे.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ व ईएसआय इस्पितळ याठिकाणी करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ही दोन्ही सरकारी इस्पितळे रुग्णांनी भरलेली आहेत. याशिवाय मडगावातील खासगी इस्पितळांतही करोनाबाधितांसाठी जागा उपलब्ध नाही. रुग्णांना गोमेकॉला नेण्यास सांगितले जाते; पण त्याठिकाणीही बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास तोही उपलब्ध होत नाही. आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णाला घरी घेऊन जाण्याशिवाय पर्याय रहात नाही. असे प्रकार मडगावात होत आहेत.
मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाचशेहून अधिक करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ईएसआय कोविड इस्पितळात २३५ खाटा असून तेथील सर्व खाटांवर रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय खासगी इस्पितळांतूनही २० ते ३० खाटा कोविडबाधितांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्या खाटाही गुरुवारी फुल्ल झालेल्या होत्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात गेल्या २४ तासांत ६७ नव्या करोनाबाधितांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. ६२ रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. १८ रुग्णांचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा ४७६ रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
याआधी इएसआय इस्पितळात तीन ते चार खाटा रिक्त दिसत होत्या. सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, २१७ रुग्णांवर उपचार सुरू होते, तर १८ खाटा रिक्त होत्या. मात्र जास्त प्रकृती बिघडलेल्या रुग्णांना या इस्पितळाऐवजी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवण्यात येते. याशिवाय अकरा खासगी इस्पितळांत कोविडबाधितांवर उपचार करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खाटाही पूर्णपणे भरल्याचे इस्पितळांत चौकशी केल्यानंतर लक्षात आले. जिल्हा इस्पितळात जागा नसल्याने रुग्णांना बांबोळीतील गोमेकॉत नेण्यास सांगण्यात येते. गोमेकॉत फोनवरून विचारणा केल्यास खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णाला आणूच नका, असा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत रुग्णांनी काय करावे, हा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांना सतावत आहे. दिवसभर जिल्हा इस्पितळ, ईएसआय इस्पितळ व इतर खासगी इस्पितळ फिरूनही श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांना कसे हाताळायचे व त्यांना कुठे न्यायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकतो. नाईलाजाने रुग्णाला पुन्हा घरी नेण्यात येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास दिवसाला मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
....
करोना तपासणी केंद्राच्या जागेत बदल
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या इमारतीत रॅपिड अॅटिजन तपासणी व आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब घेण्याचे केंद्र होते. सध्या जिल्हा इस्पितळातील रुग्णांची संख्या वाढली असल्याने याठिकाणचे करोना तपासणी केंद्र दुसरीकडे नेण्याची मागणी होत होती. वैद्यकीय अधीक्षक दीपा कुरैया यांनी सकाळी आदेश जारी करत दुपारी दोन वाजल्यापासून करोना तपासणी केंद्र जिल्हा इस्पितळातून रवींद्र भवन मडगाव येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याचे व सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत तपासणी सुरू राहील, असे सांगितले आहे.
....
सासष्टीतील १३ जणांचा मृत्यू
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून कासावली आरोग्य केंद्रात एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात सासष्टीतील १३ जणांचा मृत्यू झाला असून यात मडगाव येथील दोन, नावेली येथील तीन रुग्ण, आर्ले येथील एक, कुंकळ्ळी परिसरातील दोन रुग्ण, फातोर्डा येथील ए़क, बाणावली येथील एक, माजोर्डा येथील दोन रुग्णांचा व सासष्टी परिसरातील एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मडगावात अजूनही २,२५३ सक्रिय रुग्ण असून बाळ्ळी ६०७, कासावली १,०८३, कुडतरी ५५२, लोटली ६५२, नावेली ५०८ सक्रिय बाधित आहेत.