जमावबंदी असूनही म्हापशात भाजपची निदर्शने

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा निषेध


06th May 2021, 01:00 am
जमावबंदी असूनही म्हापशात भाजपची निदर्शने

फोटो - गांधी चौक, म्हापसा येथे निदर्शने करताना भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ येथील गांधी चौकात भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू आहे. तरीही भाजप कार्यकर्ते जमावबंदीचा नियम डावलून या निदर्शन कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रशासकीय यंत्रणेनेही त्यांना अटकाव केला नाही.
बुधवारी सायंकाळी भाजपचे उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, माजी नगरसेवक राजसिंह राणे, माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो, हनुमंत वारंग, यशवंत गवंडळकर, योगेश खेडेकर व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी स्तब्धता पाळून पश्चिम बंगालमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली. ममता बॅनर्जी व तृणमूल पक्षाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विधानसभा निवडणूक निकालानंतर तृणमूलच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमानवी हिंचासार चालविला आहे. भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. याचा निषेध यावेळी करण्यात आला.
राजकारण करण्याची ही योग्य वेळ नाही. पण तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये अराजक माजवले आहे. तेथील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याचे या निदर्शनातून आम्ही दाखवून दिले आहे. भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा या आंदोलनाद्वारे प्रतीकात्मक निषेध करण्यात आला. देशात लोकशाही असून झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही.
_ सिद्धार्थ कुंकळ्येकर, माजी आमदार