इंग्लंडचे खेळाडू मायदेशी रवाना

बटलर, बेयरस्टो, मोईन अली यांच्यासह आठ जणांचा समावेश


05th May 2021, 11:56 pm

लंडन : बीसीसीआयने आयपीएलचा १४वा हंगाम मंगळवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर परदेशी खेळाडू घरी कसे जातील, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक देशांनी भारतात करोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने विमान सेवा बंद केली आहे. यामुळे काही देशातील खेळाडू अडकले आहेत. मात्र, इंग्लंडचे ८ खेळाडू बुधवारी लंडनसाठी रवाना झाले.
आयपीएल स्थगितीची घोषणा झाल्यानंतर काही तासातच दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंनी अहमदाबादवरून दिल्ली गाठली आणि तेथून त्यांनी लंडनच्या हीथ्रो विमानतळाला जाणारे विमान पकडले. जे खेळाडूं लंडनला रवाना झाले आहेत त्यामध्ये जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, सॅम बॅलिंग्स, ख्रिस वॉक्स, मोइन अली, जेसन राॅय, सॅम करन आणि टॉम करन यांचा समावेश आहे.
दरम्यान, इंग्लंडमध्ये पोहोल्यानंतर त्यांना सरकारने ठरवून दिलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन व्हावे लागले, असे इंग्लंड बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले. याशिवाय जे खेळाडू आयपीएल खेळत होते. त्यामध्ये इयान मॉर्गन, डेव्हिड मलान आणि ख्रिस जॉर्डन हे पुढील ४८ तासांत भारतातून बाहेर पडतील, असेही म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मात्र कोंडी
आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, कोच, अंपायर आणि अन्य स्टाफ मेंबर यांची संख्या ३८ इतकी आहे. या सर्वांना घरी परतण्यासाठी मात्र फार वाट पाहावी लागणार आहे. कारण ऑस्टेलिया सरकारने त्यांना भारतातून येण्यास १५ मे पर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील खेळाडू पेचात अडकले आहेत. त्यांना मालदीव आणि श्रीलंकेत थांबावे लागले आणि तेथून ऑस्ट्रेलियात जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआयनेही पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांसाठी चार्टड विमान उपलब्ध करून दिले जाणार आहे. जेणेकरून ते सुरक्षितपणे ऑस्ट्रेलियात पोहोचू शकतील.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची घरवापसी

आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची घरवापसी होणार असून त्यांना सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने कागिसो रबाडा व अॅनरिच नॉर्ट्झे यांच्यात भीतीचे वातावरण आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात फाफ ड्यूप्लेसिस, इम्रान ताहीर व लुंगी एनगीडी यांनाही करोनाची भीती आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका सरकारने खेळाडूंना मायदेशात परतण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागेल. आयपीएलमध्ये जवळपास १४ खेळाडू व प्रशिक्षक सहाभागी झाले होते.

बीसीसीआयचे लक्ष्य सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचे आहे. चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजीचे प्रशिक्षक मायकल हसी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना भारतात क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करावा लागले.