‘आयपीएल स्थगित, रद्द नाही’


05th May 2021, 11:55 pm

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे, रद्द केलेला नाही, असे आयपीएल‍ कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले आहे. मागील दोन-तीन दिवसांत काही खेळाडू, स्पोर्ट स्टाफ सदस्य आणि ग्राऊंड स्टाफच्या सदस्यांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल कौन्सिलला ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले. परंतु, ही स्पर्धा रद्द झालेली नसून आम्ही विविध पर्यायांचा विचार करत असल्याचे ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.
आयपीएलचा उर्वरित मोसम कुठे आणि कधी घेता येईल यासाठी आम्ही विविध पर्यायांचा विचार करत आहोत. करोनाने एकूण चार संघांच्या बायो-बबलमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर ठरल्याप्रमाणे या स्पर्धेचे सामने घेत राहणे शक्य नव्हते. त्यातच सध्याच्या परिस्थितीत काही खेळाडूंना सुरक्षित वाटत नव्हते. त्यामुळे आम्ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला, असे पटेल म्हणाले. तसेच स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही लवकरच नव्या तारखा ठरवू, असेही त्यांनी सांगितले.
लवकरच नव्या तारखा ठरवू
देशात करोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे आयपीएलला पुन्हा कधी सुरुवात होणार हे आताच सांगणे अवघड आहे. परंतु, आम्ही लवकरच नव्या तारखा ठरवू, असे पटेल म्हणाले.