कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतचा टॉप टेनमध्ये प्रवेश

यष्टिरक्षक-फलंदाज धोनीला जमला नाही तो विक्रम पंतने रचला


05th May 2021, 11:38 pm

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून टीम इंडियात स्थान पटकावणाऱ्या ऋषभ पंतला सुरुवातीच्या काही सामन्यांत साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र, गेल्या केवळ अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा विक्रम केला, जो १५ वर्षांत धोनीलाच काय, तर भारताच्या एकाही यष्टिरक्षक-फलंदाजाला करता आलेला नाही. आयसीसीने बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली असून त्यात ऋषभने टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे.
ऋषभने टॉप टेन फलंदाजांमध्ये प्रवेश करताना विराट कोहली (५) व रोहित शर्मा (६) यांच्या पंक्तित स्थान पटकावले आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टॉप टेनमध्ये प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. अनेक विक्रम नावावर असलेल्या महेंद्रसिंग धोनीला १९ व्या क्रमांकापर्यंत मजल मारता आली होती. ऋषभ पंत संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहे. रोहित व न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स हेही सहाव्या स्थानावर आहेत. या तिघांच्याही खात्यात ७४७ गुण आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली ८१४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
ऋषभने २० कसोटी सामन्यांत ४५.२६च्या सरासरीने १३५८ धावा केल्या आहेत. त्यात तीन शतके व ६ अर्धशतकांचा समावेश आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ९व्या स्थानी गेला असून डेव्हिड वॉर्नर १०व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन, ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन हे अव्वल तीन क्रमांकावर आहेत. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुट चौथ्या क्रमांकावर आहे.
ऋषभ पंतने मागील ७ ते ९ महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऋषभने उल्लेखनीय कामगिरी करताना टीम इंडियाकडे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली. त्यानंतर भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याची बॅट चांगली तळपली. त्याचाच फायदा आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याला झाला.