करोनामुक्तीसाठी पालिका, पंचायत मंडळांवरही जबाबदाऱ्या

सरकारचा निर्णय; घरी विलगीकरणात असलेल्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th May 2021, 11:29 pm
करोनामुक्तीसाठी पालिका, पंचायत मंडळांवरही जबाबदाऱ्या

पणजी : करोना प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने राज्यातील पालिका आणि पंचायत मंडळांवरही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. गृह विलगीकरणात असलेल्या करोनाबाधितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. महसूल सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भातील आदेश बुधवारी जारी केला आहे.
लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. पण बरेच बाधित रस्त्यांवर तसेच सार्वजनिक स्थळी फिरत आहेत. त्यांच्यामुळे करोना विषाणू आणखी वेगाने पसरत आहे. त्यामुळे आपापल्या पालिका, पंचायत परिसरातील अशा बाधितांवर लक्ष ठेवून राहण्याच्या सूचना सरकारने मंडळांना केल्या आहेत. घरी विलगीकरणात असलेल्यांची यादी संबंधित पालिका, पंचायत मंडळांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात येईल. पण, मंडळांना त्याबाबत गोपनीयता बाळगावी लागेल, असे आदेशात म्हटले आहे. याशिवाय ज्या करोनाबाधित रुग्णांची परिस्थिती गंभीर होईल त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासह वैद्यकीय मदत, अन्न, औषधे पुरवण्याचेही निर्देश सरकारने दिले आहेत. पालिका तसेच पंचायतींनी करोना प्रसार रोखण्यासाठी पूर्ण योगदान द्यावे. आपापल्या क्षेत्रात जमावबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आवश्यकता भासल्यास पोलिसांची मदत घ्यावी, असा सूचनाही आदेशात करण्यात आल्या आहेत.
१७ इन्सिडन्ट कमांडर्सची नेमणूक
- करोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने पाच पालिका आणि बारा तालुक्यांत १७ इन्सिडन्ट कमांडर्सची नेमणूक केली आहे.
- म्हापसा पालिकेसाठी क्लेन मादिरा, फोंड्यासाठी प्रदीप नाईक, मडगावसाठी आग्नेल फर्नांडिस, पणजीसाठी आग्नेलो ए. जे. फर्नांडिस, तर मुरगाव पालिकेसाठी जयंत तारी यांची नेमणूक केली आहे.
- बार्देश तालुक्यासाठी मिनिनो डिसोझा, पेडणेसाठी मायकल डिसोझा, तिसवाडीसाठी नारायण सावंत, डिचोलीसाठी संजीव गडकर, धारबांदोड्यासाठी प्रशांत शिरोडकर, फोंड्यासाठी राजन सातार्डेकर, सत्तरीसाठी विनेश आर्लेकर, काणकोणसाठी विनायक वळवईकर, सांगेसाठी अरविंद बुगडे, केपेसाठी संतोष कुंडईकर, सासष्टीसाठी पराग नगर्सेकर, तर मुरगावसाठी दीपक बांदेकर यांची नेमणूक झाली आहे.

हेही वाचा