निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू

पेडण्यात उठाबशा, फातोर्ड्यात लाठीचा प्रसाद; रस्त्याकडेची दुकानेही केली बंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th May 2021, 11:27 pm
निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू


पेडणे परिसरात अनावश्यक फिरणाऱ्यांना उठाबशा काढायला लावताना पोलीस.

पणजी : देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून राज्यातही मोठ्या प्रमाणात मृत्यूत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करून मार्गदर्शक तत्त्वे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. याची दखल घेऊन निर्बंधांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस सक्रिय बनले आहेत.
राज्यात दिवसेंदिवस बाधितांत तसेच मृत्यूत वाढ होत आहे. त्यामुळे करोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने १० मेपर्यंत कडक निर्बंध जाहीर केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणासही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकेच नाही तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही ठरावीक वेळेतच उघडण्याची परवानगी देण्यात आली. हे निर्बंध सरकारने लागू केले असले तरी त्याचे नागरिक नीट पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे. याची दखल घेऊन स्थानिक नगरपालिका किंवा पंचायतींनी स्वतःच्या पातळीवर आदेश जारी करून संबंधित परिसरांत निर्बंध लागू केले आहेत. नव्या निर्बंधानुसार फार्मसी, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. याची दखल घेऊन राज्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांतील पोलिसांनी बुधवारी निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे.
अशी सुरू केली अंमलबजावणी..
- ‍पेडणे पोलिसांनी आवश्यक नसतांना फिरणाऱ्या नागरिकांना उठाबशा काढण्याची शिक्षा केली आहे.
- फातोर्डा पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर खुली दुकाने बंद करण्यास लावली.
- फातोर्डा पोलिसांनी कोणतेही कारण नसताना फिरणाऱ्या काहींना लाठीचा प्रसादही दिला आहे.
- या व्यतिरिक्त राज्यातील इतर पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद केली आहेत.
- रस्त्याच्या बाजूला बसून वस्तूंची विक्री करणाऱ्या नागरिकांना संबंधित परिसरातून हाकलून लावण्यात येत अाहे.
- मास्क न लावणाऱ्यांवर तसेच इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे.
- पणजीतही मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली असून, रस्त्याकडेला भाजीविक्री करणाऱ्यांना हटवण्यात आले.

हेही वाचा