नवा उच्चांक ७१ बळी; ३,४९६ बाधित

धोक्यात वाढच; चिंता आणखी गडद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th May 2021, 11:25 pm
नवा उच्चांक ७१ बळी; ३,४९६ बाधित

पणजी : राज्यात बुधवारी तब्बल ७१ करोना बळींची, तर चोवीस तासांत उच्चांकी ३,४९६ बाधितांची नोंद झाली. नव्या ७१ मृतांत मंगळवार, बुधवार तसेच काही पूर्वीच्या मृत्यूंचीही नोंद आहे. बुधवारच्या आकडेवारीमुळे सरकार, प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि गोमंतकीय जनतेच्याही पायाखालची वाळू सरकली आहे.
नव्या ७१ पैकी ४५ जणांचा गोमेकॉत, २० जणांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात, दोघांचा उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात, तर चिखली, कुडचडे येथील आरोग्य केंद्रे आणि हॉस्पिसियो इस्पितळात प्रत्येकी एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला. सोमवारपासून बाधितांसह करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. बुधवारी २,१९२ जणांनी करोनावर मात केली. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या २७,९६४ झाली आहे. तर सुरुवातीपासून आतापर्यंत राज्यात सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा १,०४,३९८ झाला असून, त्यातील ७४,९९१ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केल्याचे आरोग्य खात्याने आपल्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे.
राज्यातील मोठ्या शहरांत करोना प्रसार अजूनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तेथील सक्रिय बाधितांत वाढ होत आहे. बुधवारी मडगावात सर्वाधिक २,२७५ सक्रिय बाधित होते. तर पणजीत १ण७६१, फोंड्यात १,५५८, कांदोळीत १,५२३, म्हापशात १,४६६, पर्वरीत १,४५३, कुठ्ठाळीत १,३१७, साखळीत १,१८१, कासावलीत १,१४६, तर डिचोलीत १,०२५ सक्रिय बाधित होते. बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने अनेक पंचायतींनी स्वत:हून लॉकडाऊनचा निर्णय घेत करोनामुक्तीसाठी लढा सुरू केला आहे.