करोना मृतांच्या आकडेवारीत घोळ!

एप्रिलमधील मृतांची नोंद मेमध्ये; विरोधकांची टीका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th May 2021, 11:21 pm
करोना मृतांच्या आकडेवारीत घोळ!

पणजी : करोनामुळे मृत होणाऱ्यांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून घोळ सुरू आहे. आरोग्य खात्याकडून दररोज जारी होणाऱ्या बुलेटिनमध्ये चार-पाच दिवसांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तींच्या नावांचीही नोंद केलेली असते. त्यामुळे जनतेत संभ्रमावस्था पसरली असून, यावरून विरोधकांनीही सरकारवर आरोपबाजी सुरू केली आहे.
बुधवारच्या बुलेटिनमध्ये ७१ बळींमध्ये ४ व ५ मे तसेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मृत झालेल्यांची नोंद आहे. याशिवाय काहींचा मृत्यू कधी झाला त्याचीही नोंद सरकारकडे नाही. त्यामुळे सरकार बळींचा आकडा जाणीवपूर्वक दाबून ठेवत असल्याचा आरोप विरोधी काँग्रेस, मगो पक्षांकडून होत आहे. प्रत्येक दिवशी निघणाऱ्या बुलेटिनमध्ये आरोग्य खात्याने चोवीस तासांतील मृत आणि करोनाबाधितांचा आकडा देणे अभिप्रेत आहे. पण, मृतांचा आकडा वाढलेला दिसल्यास त्याचा राजकीय फटका बसेल या भीतीने सरकार सत्य परिस्थिती जनतेसमोर आणत असल्याची टीकाही त्यांच्याकडून सुरू आहे. आरोग्य खात्याच्या अशा कारभारामुळे जनतेतही संभ्रम पसरत चालला असून, अनेकांकडून खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात येत आहेत.
तांत्रिक कारणे अशी...
- ईएसआय इस्पितळाचे प्रशासक डॉ. उदय काकोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड आकडेवारीचे दररोजचे बुलेटिन सायंकाळी ४ वाजता आरोग्य खात्याच्या पणजीतील कार्यालयातून जारी करण्यात येते. सर्वच इस्पितळांना दररोज सायंकाळी ४ पर्यंतची मृत आणि बाधितांची आकडेवारी खात्याला सादर करावी लागते.
- बऱ्याचदा रुग्ण मृत झाल्यानंतर त्यांचा नातेवाईकांचा तत्काळ संपर्क होत नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर इतर काही कागदोपत्री सोपस्कार पार पाडावे लागतात. अगोदरच तणावात असलेले डॉक्टर इतर कामांमुळे अशी कामे वेळेतच पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे एका दिवशीच्या बुलेटिनमध्ये आधीच्या दिवसांत मृत झालेल्यांचीही नोंद असते, असेही काकोडकर यांनी सांगितले.

हेही वाचा