राज्यात अर्ध्या तासाला एक बळी!

तरुणांचा धक्कादायक अंत; दररोज तीन हजारांवर बाधित, राज्यासमोर समस्यांचा डोंगर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th May 2021, 11:06 pm
राज्यात अर्ध्या तासाला एक बळी!

पणजी : राज्यात करोनाचा हाहाकार अद्याप कायम आहे. सद्यस्थितीत राज्यात सरासरी दर अर्ध्या तासाला एका करोनाबाधिताचा मृत्यू होत आहे. चोवीस तासांत तीन हजारपेक्षा अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. बाधित होण्याच्या दरात गोवा देशात प्रथम स्थानी आला आहे. मृत आणि बाधितांत यापुढेही लक्षणीय वाढ होण्याचा धोका वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सरकार, प्रशासकीय यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
करोनामुळे मृत आणि बाधित होणाऱ्यांची राज्यातील आकडेवारी दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. करोनाची दुसरी लाट रोखण्यात आरोग्य यंत्रणेला आलेले अपयश स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजपचे आमदार असलेल्या बाबूश मॉन्सेरात यांनी आरोग्यमंत्री आणि आरोग्य यंत्रणेवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत.
इतर देशांमध्ये तसेच शेजारील महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट थैमान घालत असतानाही गोवा सरकार निवडणुकांमध्येच व्यस्त राहिले. पहिल्या लाटेनंतर सरकारने करोनाचा धोका लक्षात घेऊन त्यादृष्टीने कोणत्याही साधन-सुविधा उभारल्या नाहीत. सरकारी इस्पितळे सज्ज ठेवली नाहीत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, पीपीई कीट तसेच उपचारांसाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीस प्राधान्य देण्यात आले नाही. डॉक्टर, परिचारिका तसेच इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. कोविड नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच गोमेकॉसह इतर सर्वच सरकारी इस्पितळांत अवघ्या २५ ते ३० वर्षांच्या करोनाबाधितांचा उपचारांअभावी तडफडून मृत्यू होत असल्याची टीका विरोधकांसह आता जनतेकडूनही होत आहे. राज्यात ऑक्सिजनची अजिबात कमतरता नाही, असा दावा अजूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री करीत आहेत. पण, त्यांचा हा दावा किती फोल आहे, हे सरकारी इस्पितळांत करोनाचे उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाच माहीत आहे. ऑ​क्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याचे आपण गोमेकॉत उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. अनेक रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. खाट न मिळाल्याने त्यांना स्ट्रेचर किंवा जमिनीवर झोपवण्यात आले आहे. पण त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेळेत डॉक्टर येत नाहीत. किंबहुना रुग्णांवर आवश्यक ते उपचारही केले जात नाहीत. त्यामुळेच राज्यातील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. सरकारी इस्पितळांतील परिस्थिती अशीच राहिल्यास राज्यात दररोज २०० ते २५० जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया एका रुग्णाच्या नातेवाईकाने ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

भीषण वास्तव...
- दर ३० मिनिटांनी एकाचा मृत्यू
- गेल्या ३५ दिवसांत ४६,००० करोनाबाधित
- गेल्या ३५ दिवसांत ४५ वर्षांखालील ५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

बाधित होण्याच्या दरांत गोवा प्रथम
दररोज करोनाबाधित होण्याच्या दरात गोवा (४८ टक्के) देशात अव्वल ठरले आहे. त्यानंतर हरयाणा ३७ टक्के, पश्चिम बंगाल ३३ टक्के, दिल्ली ३२ टक्के, पुदुच्चेरी ३० टक्के, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान प्रत्येकी २९ टक्के, कर्नाटक २८ टक्के, चंदिगड २६ टक्के, महाराष्ट्र २४ टक्के, ओडिशा, आंध्रप्रदेश व सिक्कीम प्रत्येकी २३ टक्के, केरळ २२ टक्के, हिमाचल प्रदेश २० टक्के या राज्यांचा क्रमांक लागतो.

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सल्ला
करोनापासून दूर राहण्यासाठी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा व्हिडिओ पाहून सिम्हा योगीक क्रिया करण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. करोना प्रसार काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी ही क्रिया फायदेशीर ठरेल, असे परिपत्रक सर्वसामान्य प्रशासन खात्याचे अवर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी जारी केले आहे.

युवावर्गातही संतापाची लाट
करोनावर मात करण्यासाठी लसीकरण प्रभावशाली पर्याय असल्याचे सिद्ध झाल्याने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. पण सीरम इ​न्स्टिट्यूटने अजूनही राज्याला पाच लाख लसींचा कोटा न दिल्याने सरकारने लसीकरण सुरू केले नाही. त्यामुळे राज्यातील युवावर्गातही सरकारविरोधात संतापाची लाट पसरली आहे.

खातेप्रमुख ठरवणार ‘फ्रंटलाईन कोविड वर्कर’
राज्य व केंद्र सरकारचे कर्मचारी, महामंडळे, सरकारी संस्था, पत्रकार, बँक कर्मचारी, टेलिकॉम-इंटरनेट सेवा देणारे, सरकारमार्फत सुरू असलेल्या निवारा घरांमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ‘फ्रंटलाईन कोविड वर्कर’ खातेप्रमुख निश्चित करतील, असा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे.

हेही वाचा