पंधरा महिन्यांत ५,०५४ वाहन परवाने तात्पुरते निलंबित

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मार्गदर्शक तत्त्वे : अतिवेगाबद्दल २,६५१ जणांवर कारवाई


04th May 2021, 11:30 pm
पंधरा महिन्यांत ५,०५४ वाहन परवाने तात्पुरते निलंबित

फोटो : ट्राफिक पोलीस (संग्रहित)
प्रसाद शेट काणकोणकर
गोवन वार्ता
पणजी : देशात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये वाढ होत असल्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा समिती स्थापन करून चालकांवर कारवाई करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा अधिकार या समितीला दिला होता. समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ या पंधरा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील ५,०५४ चालकांचे वाहन परवाने वाहतूक खात्याने तीन महिन्यांसाठी निलंबित केले.
देशातील अपघातीमृत्यूंची संख्या कमी व्हावी, या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली आहे. यात सदस्य म्हणून संजय मित्रा आणि डाॅ. निशी मित्तल, तर सचिव म्हणून एस. डी. बांगा यांचा समावेश आहे. या समितीने अपघात, रस्त्याची बांधणी, अपघाती मृत्यू तसेच इतर संबंधित विषयांचा अभ्यास करून अहवाल तयार केला आणि राज्य सरकारला मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिवेगाने वाहन चालविणे, जंक्शन जवळ असलेल्या वाहतूक सिग्नलचे पालन न करणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून जास्त मालाची वाहतूक करणे, दारू पिऊन गाडी चालविणे आणि गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे असे करणाऱ्या चालकांचा वाहन परवाना कमीतकमी तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद केली आहे. दारू पिऊन गाडी चालविल्या प्रकरणी चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायालयाला दिला आहे. वरील इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना‌ शिक्षा देण्याचे अधिकार संबंधित वाहतूक खात्याला दिले आहेत. अहवाल मिळाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला न्यायालयात किंवा वाहतूक खात्यात हजर राहण्यास समन्स काढले जातात. त्यानंतर रीतसर सुनावणी घेऊन दोषी आढळल्यास त्याचा परवाना तीन महिन्यासाठी निलंबित केला जातो.
ड्रंक अँड ड्राईव्हबद्दल ५२३ चालकांवर कारवाई
मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम २१ नुसार वाहन परवाना निलंबन करण्याची तरतूद आहे. या कारवाईची अंमलबजावणी करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने देशातील सर्व राज्यांना तसेच संघ प्रदेशांना केली आहे. त्यानुसार राज्यात सर्वाधिक २,६५१ जणांचे वाहन परवाने अतिवेगाने वाहन चालविल्याबद्दल तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. दारू पिऊन गाडी चालविल्याबद्दल ५२३ चालकांचे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे १,१७४ वाहन चालकांचे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक केल्याबद्दल ५३ वाहन चालकाचे आणि जंक्शनजवळील वाहतूक सिग्नलचे पालन न केल्याबद्दल ६५३ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

हेही वाचा