बहुतांशी मंत्री आपल्याच मतदारसंघांत गुंग!

आमदार बाबूश मॉन्सेरात यांच्याकडून सरकारला ‘घरचा आहेर’; मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th May 2021, 12:09 am
बहुतांशी मंत्री आपल्याच मतदारसंघांत गुंग!

पणजी : करोनाची दुसरी लाट राज्यात अधिकाधिक भीषण होत आहे. पण बहुतांशी मंत्री अजूनही आपापल्या मतदारसंघांपुरतेच काम करीत आहेत. आरोग्य यंत्रणाही योग्य पद्धतीने काम करताना दिसत नाही. त्याचाच फटका राज्याला बसत असल्याची तक्रार आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे, अशी माहिती पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी सोमवारी दिली.
राज्यात करोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहेत. कोविड नियोजन योग्यप्रकारे करून त्यावर मात करण्याची जबाबदारी सर्वच मंत्र्यांची असते. मंत्री केवळ आपल्या मतदारसंघाचा नसतो. तो संपूर्ण राज्याचा असतो. त्यामुळे संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचे कर्तव्य मंत्र्यांनी पार पाडायला हवे. पण सध्या काही मंत्री अजूनही आपापल्या मतदारसंघांपुरतेच काम करीत आहेत. एसीमध्ये बसून केवळ आदेश देण्याचे काम करीत आहेत. राज्यातील १२ मंत्र्यांनी इतर आमदारांवर अन्याय करता कामा नये, असे मत आपण मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केले आहे. त्यावर आता मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असे आमदार मॉन्सेरात म्हणाले.
करोनाकाळात आपले कर्तव्य बजावत असलेले डॉक्टर, नर्स लोकांचे जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहेत. पण राज्यातील आरोग्य यंत्रणात अद्यापही सक्षमपणे काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचाच फटका राज्याला बसत असून, बाधित आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मोहनन, मेनका यांचे कौतुक
माजी आरोग्य सचिव नीला मोहनन तसेच माजी जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी करोनाची पहिली लाट योग्यरित्या परतवून लावली. पीपीई कीट, ऑक्सिजन, लस तसेच इतर अनेक सुविधा नसतानाही मोहनन, मेनका तसेच इतर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करून कोविड नियोजन पार पाडले. पण, सध्या अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारचे नियोजन होताना दिसत नाही, अशी खंतही आमदार मॉन्सेरात यांनी व्यक्त केली.

आरोग्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले
राज्यातील बाधित आणि मृत्यूदर कमी करून करोनावर मात करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहेत. प्रशासन, डॉक्टर यात पूर्णपणे योगदान देत आहेत. अशा परिस्थितीत कोणावरही आरोप करून चालणार नाही, असे म्हणत आरोग्यमंत्र्यांनी आमदार बाबूश मॉन्सेरात यांचे आरोप स्पष्टपणे फेटाळले. करोना स्थितीबाबत आपण दररोज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल राय यांच्याशी चर्चा करीत असतो, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा