Goan Varta News Ad

पुन्हा ४६ बळी, नवे २,७०३ बाधित

सक्रिय संख्या २५ हजारांवर; तीन दिवसांत १३८ मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th May 2021, 12:07 Hrs
पुन्हा ४६ बळी, नवे २,७०३ बाधित

पणजी : राज्यातील करोना उद्रेक कायम आहे. सोमवारी आणखी ४६ जणांचा बळी गेल्याने एकूण मृतांचा आकडा १,३२० झाला आहे. रविवार आणि सोमवारच्या चोवीस तासांत नवे २,७०३ बाधित सापडले. १,४२५ जणांनी करोनावर मात केली. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या २५,८३९ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत १३८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने सरकार, प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि गोमंतकीय जनतेतील चिंता आणि भीतीत वाढ झाली आहे.
४६ पैकी २४ जणांचा गोमेकॉत, १४ जणांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात, तिघांचा सांगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, दोघांचा उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात, तर ईएसआय, प्राथमिक आरोग्य केंद्र धारबांदोडा आणि उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात प्रत्येकी एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत करोनाचा राज्यात वेगाने प्रसार झाला. त्यामुळे बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत राज्यात सापडलेल्या एकूण करोनाबाधितांची संख्या ९८,०८८ झाली असून, मंगळवारी हा आकडा एक लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत ७०,९२९ जणांनी करोनावर मात केली आहे. पण, दुसऱ्या लाटेत करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा बाधितांचीच संख्या वेगाने वाढल्याने बरे होणाऱ्यांचा दर आणखी घसरून ७२.३१ टक्क्यांवर आला आहे.
मडगाव अडीच हजारांजवळ
राज्यातील प्रमुख शहरांतील सक्रिय करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आर्थिक राजधानी असलेले मडगाव अडीच हजारांपर्यंत पोहोचले असून, सोमवारपर्यंत तेथील सक्रिय बाधितांची संख्या २,४५४ होती. त्यानंतर कांदोळीत १,५९७, पणजीत १,५७४, म्हापशात १,४३९, फोंड्यात १,४३४, कुठ्ठाळीत १,३०७, पर्वरीत १,२८३, तर डिचोलीत १,०२२ सक्रिय बाधित आहेत.