फिरकीच्या जाळ्यात आरसीबीची ‘शिकार’

पंजाबचा बंगळुरूवर मोठा विजय : कर्णधार राहुलचे धडाकेबाज अर्धशतक


01st May 2021, 12:16 am

अहमदाबाद : हरप्रीत ब्रार आणि रवी बिश्नोई या फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) ३४ धावांनी पराभव केला. हरप्रीतने ४ षटकांमध्ये १९ धावा देत ३ गडी बाद केले. तर बिश्नोईने १७ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली. पंजाबचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय असून आरसीबीचा दुसरा पराभव आहे.
पंजाब किंग्जचे १८० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूची सुरुवात खराब झाली. सलामीवीर देवदत्त पडिक्कल ७ धावा करून माघारी परतला. त्याला मेरेडिथने बाद केले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी आरसीबीला १० षटकांत ६२ धावांपर्यंत पोहचवले. पण, हरप्रीत ब्रारने विराट कोहलीचा ३५ धावांवर त्रिफळा उडवत आरसीबीला दुसरा धक्का दिला. ब्रारने विराटला माघारी धाडल्यानंतर पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलचाही त्रिफळा उडवत आरसीबीला तिसरा आणि मोठा धक्का दिला.
आरसीबीच्या दोन मोठ्या फलंदाजांना पाठोपाठ बाद गेल्यानंतर आरसीबीला सावरण्याची जबाबदारी एबी डिव्हिलियर्सवर आली होती. पण, हरप्रीत ब्रारने त्यालाही ३ धावांवरच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत आपली तिसरी मोठी शिकार केली. ब्रारच्या भेदक माऱ्यामुळे ७० धावांच्या आतच आरसीबीचे विराट, मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्स हे स्टार फलंदाज बाद झाले.
आरसीबीची स्टार फलंदाजांनी भरलेली वरची फळी माघारी गेल्यानंतर पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी त्यांची मधली फळी कापून काढण्यास सुरुवात केली. ३१ धावा करून अजून पर्यंत खेळपट्टीवर तग धरून असलेल्या रजत पाटीदारला ख्रिस जॉर्डनने माघारी धाडले. यामुळे आरसीबीचा निम्मा संघ ९१ धावांत माघारी परतला. यानंतर रवी बिश्नोईने शाहबाज अहमद (८) आणि डॅनियल सॅम्सला (३) पाठोपाठ बाद करत आरसीबीची अवस्था १६ षटकात ७ बाद ९६ अशी केली.
त्यानंतर मात्र आरसीबीच्या हर्षल पटेल आणि कायल जेमिसन यांनी आठव्या विकेटसाठी ४८ धावांची आक्रमक भागिदारी रचून झुंज दिली. हर्षल पटेलने १३ चेंडूत ३२ धावांची आक्रमक खेळी केली पण, त्याला शामीने बाद करून आरसीबीच्या विजयाच्या आशा संपवल्या. अखेर आरसीबीने २० षटकात ८ बाद १४५ धावांपर्यंतच मजल मारता आली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. कायल जेमिसनने सलामीवीर प्रभसिमरन सिंगला ७ धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. पण, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ख्रिस गेलने आपला आक्रमक अवतार धारण करत जेमिसन टाकत असलेल्या पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात ५ चौकार ठोकून पंजाबला पन्नाशीच्या जवळ पोहचवले.
दुसऱ्या बाजूने केएल राहुल सावध फलंदाजी करत होता. पॉवर प्लेनंतरही गेलने आपला धडाका कायम ठेवत पंजाबला १० षटकांत ९० धावांपर्यंत पोहचवले. गेलही आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहचला होता. पण, डॅनियल सॅम्सने २४ चेंडूत ४६ धावा करणाऱ्या गेलला ११ व्या षटकात बाद केले. यानंतर पंजाबच्या डावाला चांगलीच गळती लागली.
गेल बाद झाल्यानंतर आलेला निकोलस पुरन शुन्यावर बाद झाला. त्याला जेमिसनने बाद केले. त्यानंतर दीपक हुड्डा खेळपट्टीवर आला पण, तोही अवघ्या ३ धावांची भर घालून माघारी परतला. हुड्डानंतर स्फोटक फलंदाज शाहरुख खान फलंदाजीला आला पण, चहलने त्याला शुन्यावरच पॅव्हिलियनची वाट धरायला लावली. पंजाबची ही वाताहत कर्णधार केएल राहुल दुसऱ्या बाजूने हतबलतेने पाहत होता.
पंजाबचा १४.४ षटकात ११८ धावांतच निम्मा संघ माघारी गेल्यानंतर राहुलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने हरप्रीत ब्रारच्या साथीने पंजाबची धावगती वाढवली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. राहुलने ९१ धावांची नाबाद खेळी करत पंजाबला १७९ धावांपर्यंत पोहचवले. त्याला हरप्रीत ब्रारने १७ चेंडूत नाबाद २५ धावा करून चांगली साथ दिली.
राहुलने पटकाविली ऑरेंज कॅप
चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या मागील सामन्यातील सलामीवीर फाफ ड्युप्लेसिसने अर्धशतकासह विशेष कामगिरी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान गाठले होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने ९१ धावांची कप्तानी खेळी साकारत ७ सामन्यांत ३३१ धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपची शर्यत अजूनच चुरशीची झाली आहे. ड्युप्लेसिसच्या ६ सामन्यांत २७० धावा आहेत. तर शिखर धवन तिसऱ्या स्थानी घसरला असून त्याच्या ६ सामन्यांत २६५ धावा झाल्या आहेत.
चार कोटींचा फलंदाज चौथ्यांदा शून्यावर बाद
पंजाब किंग्जच्या निकोलस पुरनची या आयपीएलमधील निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. मागच्या आयपीएलमध्ये २५ सिक्स लगावणारा पुरन या सिझनमध्ये सपेशल फ्लॉप ठरला असून सातपैकी ४ सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा संधी देणाऱ्या कर्णधार के.एल. राहुलची डोकेदुखी वाढली आहे. निकोलस पूरनने या आयपीएलमध्ये सात सामन्यात ४.६६च्या सरासरीने २८ धावा काढल्या असून १९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. सतत संधी देऊनही शून्यच्या चक्रात अडकलेल्या पुरनला पुढच्या सामन्यात राहुल वगळण्याची शक्यता आहे.
......
संक्षिप्त धावसंख्या

पंजाब किंग्ज : २० षटकांत ५ बाद १७९ धावा
रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ८ बाद १४५ धावा