टी-२० वर्ल्ड कप युएईत होण्याची शक्यता

बीसीसीआयचे संकेत


01st May 2021, 12:15 am

नवी दिल्ली : देशातील करोना महामारी नियंत्रणात आली नाही तर यावर्षी होणारा टी-२० वर्ल्ड कप भारतामध्ये होणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने प्रथमच या विषयावर ही मोठी माहिती दिली आहे. यावर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. मात्र, देशातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हा वर्ल्ड कप भारतामध्ये होण्याची शक्यता कमी आहे. या परिस्थितीमध्ये संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशात ही स्पर्धा होईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, बीसीसीआयने वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाची आशा अद्याप सोडलेली नाही. माझी या स्पर्धेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही स्पर्धा देशातच व्हावी हा माझा प्रयत्न आहे. मात्र, आम्हाला सामान्य आणि खराब या दोन्ही परिस्थितीचा विचार करावा लागेल. याच आधारावर आम्ही आयसीसी सोबत चर्चा करणार आहोत.
या स्पर्धेचे पर्यायी ठिकाण म्हणून यूएईचा विचार करून आम्ही तयारी करत आहोत. या विषयावर अंतिम निर्णय बीसीसीआय घेईल, असे मल्होत्रा यांनी सांगितले. यापूर्वी देशातील करोना व्हायरसमुळे मागच्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयने युएईमध्ये केले होते. बीसीसीआयने मागच्या वर्षी अमिरात क्रिकेट बोर्ड (इसीबी) यांच्यासोबत एक करार केला आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवण्यास इसीबीला अडचण येणार नाही. याबाबत इसीबीने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.