सीएसके सुसाट; दहा गुणांसह अव्वलस्थानी

हैदराबादवर सात गडी राखून विजय : वाॅर्नरचे ऐतिहासिक अर्धशतक व्यर्थ


29th April 2021, 12:45 am

दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादचे १७२ धावांचे आव्हान तीन गड्यांच्या मोबदल्यात १९ षटकातच पार करत सात गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच चेन्नईने गुणतालिकेत १० गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( ७५) आणि फाफ ड्युप्लेसिसने (५६) १२९ धावांची शतकी सलामी दिली. हैदराबादकडून राशीद खानने नंतरच्या सत्रात चेन्नईचे पाठोपाठ तीन फलंदाज बाद करत सामना पलटवण्याचा प्रयत्न केला. पण, रैना आणि जडेजा या अनुभवी जोडीने चेन्नईचा विजय १९व्या षटकाच निश्चित केला.
सनरायझर्स हैदराबादने ठेवलेल्या १७२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जने दमदार सुरुवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिसने पॉवर प्लेचा चांगलाच फायदा उचलत ६ षटकांत ५० धावांपर्यंत मजल मारली. यात ड्युप्लेसिसचा ३२ धावांचा वाटा होता. तर गायकवाड बॉल टू रन रणनितीने खेळत होता.
पण, पॉवर प्लेनंतर ऋतुराजनेही आपला गिअर बदलत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ड्युप्लेसिसही आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. या दोघांनी ११ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. गायकवाड आणि ड्युप्लेसिस यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या सामन्यात पन्नासपेक्षा जास्त धावांची सलामी दिली. यानंतर ऋतुराज गायवाडने तुफान फटकेबाजी करत आपले ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. गायकवाड अर्धशतकानंतरही स्वस्थ बसला नाही. त्याने ४४ चेंडूतच ७५ धावांपर्यंत मजल मारली.
अखेर आक्रमक खेळणाऱ्या गायकवाडला (७५) राशीद खानने बाद करत १२९ धावांची सलामी देणारी ही जोडी फोडली. गायकवाड बाद झाल्यानंतर आलेल्या मोईन अलीनेही तीन चौकार मारत धडाक्यात सुरुवात केली. पण, त्यालाही राशीद खानने १५ धावांवर बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. त्यामुळे आता सर्व मदार सेट झालेल्या ड्युप्लेसिसवर होती. पण, राशीद खानने सीएसकेला पुन्हा एकदा दणका देत ड्युप्लेसिसला ५६ धावांवर बाद केले.
आता सीएसकेला विजयासाठी ३० चेंडूत २८ धावांची गरज होती. खेळपट्टीवर रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना ही डावखुरी जोडी होती. या दोघांनी १७ व्या षटकात सीएसकेला १५०चा टप्पा पार करून दिला. त्यानंतर या दोघांनी सामना सीएसकेच्या बाजूने झुकवण्यास सुरुवात केली. या दोघांनी १९ व्या षटकात १७२ धावांचे टार्गेट पूर्ण करत चेन्नईला सात विकेट्सनी विजय मिळवून दिला. रैनाने नाबाद १७ धावा केल्या, तर जडेजाने नाबाद ७ धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून राशीद खानने ३६ धावांत ४ विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आक्रमक सुरुवात करत पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. पण, सॅम करनने जॉनी बेअरस्टोला ७ धावांवर बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यानंतर वॉर्नरची धावगती मंदावली. वॉर्नरच्या जोडीला आलेल्या मनीष पांडेने सेट झाल्यानंतर आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली.
मनीष पांडेने संथ फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरला मागे टाकत अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली. त्याने १४व्या षटकात संघाला शंभरी पार करून दिली. याच षटकात त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्यानंतर संथ फलंदाजी कणाऱ्या वॉर्नरनेही ५० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, वॉर्नरला शेवटपर्यंत आपली मंद धावगती वाढवता आली नाही. अखेर त्याला एन्गिडीने ५७ धावांवर बाद केले.
वॉर्नर बाद झाला त्यावेळी हैदराबादच्या १७ षटकांत २ बाद १२७ धावा झाल्या होत्या. एन्गिडीच्या त्याच षटकात वॉर्नर पाठोपाठ मनीष पांडेही आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात ६१ धावांवर बाद झाला. अखेरची दोन षटके राहिली असताना केन विल्यमसन फलंदाजीला आला. त्याने येताक्षणी आक्रमक फटके मारत हैदराबादची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. त्याने १९व्या षटकात शार्दुल ठाकूरला ३ चौकार आणि १ षटकात मारत २० धावा वसूल केल्या. याचबरोबर हैदराबाद १६० च्या जवळ पोहचला. त्यानंतर सॅम करन टाकत असलेल्या शेवटच्या षटकात केदार जाधवने चौकार आणि षटकार मारत हैदराबादला १७१ धावांपर्यंत पोहचवले.
डेव्हिड वॉर्नरचे एकाच सामन्यात तीन विक्रम
आयपीएल गुणतालिकेत तळात असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात संथ फलंदाजी केली. परंतु, त्याने ही संथ फलंदाजी करत तीन विक्रम आपल्या नावावर केले. वॉर्नरने टी-२० मध्ये आपल्या १० हजार धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. याचबरोबर ५० चेंडूत अर्धशतक ठोकत आपले आयपीएलमधील अर्धशतकांचे अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये ५० अर्धशतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. तर या सामन्यात वाॅर्नरने दोन षटकारांसह आयपीएलमध्ये २०० षटकार पटकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत काही मोजक्याच फलंदाजांना आयपीएलमध्ये २०० षटकार लगावता आले आहेत. या यादीत आता वॉर्नरचाही समावेश झाला आहे.
..........
संक्षिप्त धावफलक :
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ३ बाद १७१ धावा
चेन्नई सुपर किंग्स : १८.३ षटकांत ३ बाद १७३ धावा