राजस्थान विरुद्ध जिंकण्यास मुंबई सज्ज


29th April 2021, 12:44 am

दिल्ली : आयपीएलच्या २३व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ पंजाब किंग्जकडून पराभूत झाला. तर दुसरीकडे राजस्थानने केकेआरचा पराभव केला होता.
मुंबई इंडियन्सच्या संघाला बऱ्याच समस्या सध्याच्या घडीला जाणवत आहेत. त्यांच्याकडून गोलंदाजी चांगली होत असली तरी त्यांची फलंदाजी मात्र चांगली होताना दिसत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात चिंतेचे वातावरण आहे. मुंबईची फलंदाजी अजूनही फॉर्मात आलेली नाही. केवळ कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव खेळण्यास सक्षम दिसत आहेत. मुंबईच्या फलंदाजांना मैदान बदलल्यामुळे थोडासा दिलासा मिळू शकेल.
क्रिकेटप्रेमी किरोन पोलार्डकडून धुंवाधार फलंदाजीची वाट पाहत आहेत. याशिवाय लयीत दिसत नसलेल्या ईशान किशन आणि हार्दिक पांड्याकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. मुंबईतर्फे जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारतील. याशिवाय विकेट घेण्याची आणि धावा जमवण्याची जबाबदारी राहुल चहरवर असणार आहे.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचे फलंदाज या स्पर्धेत चांगलेच फॉर्ममध्ये दिसत आहेत. जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन अजूनही मोठ्या खेळीच्या शोधात आहेत. तर गेल्या काही सामन्यांपासून ख्रिस मॉरिस आणि डेव्हिड मिलर खालच्या फळीत चांगली कामगिरी करत आहेत. वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. बांगलादेशचा मुख्य गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकरिया पुन्हा एकदा दिल्ली मैदानावर आपल्या विविधतेने फलंदाजांना त्रास देताना दिसतील.
मुंबई इंडियन्सला आपल्या फलंदाजीमध्ये मोठे बदल करावे लागतील. त्याचबरोबर काही राखीव खेळाडूंनाही त्यांना संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांना मुंबई इंडियन्सचा संघ आता काही सामन्यांसाठी विश्रांती देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
.........
आजचा सामना
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
वेळ : सायं. ३.३० वा.
स्थळ : अरुण जेटली मैदान, दिल्ली
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क