पालिकांसाठी ६६.७० टक्के मतदान

४०९ उमेदवारांच्या भवितव्याचा सोमवारी फैसला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April 2021, 11:38 pm
पालिकांसाठी ६६.७० टक्के मतदान

पणजी : करोनाच्या सावटाखाली शुक्रवारी झालेल्या म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाच पालिकांसाठी ६६.७०, तर कारापूर-सर्वण व वेळ्ळी पंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी ७८.३८ टक्के मतदानाची नोंद झाली. जवळपास सर्वच ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. निवडणुका आणि पोटनिवडणुकांची मतमोजणी येत्या सोमवारी होणार आहे.
शुक्रवारी सकाळी ८ पासून सर्वच ठिकाणी मतदानास प्रारंभ झाला. म्हापशातील ३३,४८३ पैकी २२,९५९, मडगावातील ६६,४१३ पैकी ४२,६७०, मुरगावातील ६८,०८९ पैकी ४४,२८२, सांगेतील ५,३४३ पैकी ४,३५४ आणि केपे येथील ११,८९७ पैकी ९,२८१ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. तर, कारापूर-सर्वणमधील प्रभाग दोनमधील ६२७ पैकी ५३९ आणि वेळ्ळीतील प्रभाग चारमधील ३७२ पैकी २४४ जणांनी मतदान केले. पालिकांमधील ४०२ आणि पोटनिवडणुकांतील ७ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेट्यांत बंद झाले असून, त्यांच्या भवितव्याचा फैसला सोमवारी होणार आहे.
कोठे किती मतदान?
पालिका
- म्हापसा : ६८.५७ टक्के
- मडगाव : ६४.२५ टक्के
- मुरगाव : ६५.०४ टक्के
- सांगे : ८१.४९ टक्के
- केपे : ७८.०१ टक्के
पंचायत पोटनिवडणुका
- कारापूर (प्रभाग २) : ८५.९६ टक्के
- वेळ्ळी (प्रभाग ४) : ६५.५९ टक्के
१७७ बाधितांनी बजावला अधिकार
सायंकाळी ४ ते ५ या एका तासात करोनाबाधितांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यानुसार पाचही पालिका क्षेत्रांतील १७७ बाधितांनी मतदानाचा अधिकार बजावला. पोटनिवडणुकांत मात्र एका​ही बाधिताने मतदान केले नाही. म्हापशातील ४३, मडगावातील ५२, मुरगावातील ५७, सांगेतील २१, तर केपे येथील ४ बाधितांनी पीपीई कीट परिधान करून मतदान केले.
संसर्ग असूनही प्रचार, गुन्हा दाखल
करोनाबाधित असतानाही मतदानादिवशी घराबाहेर पडून प्रचार करणाऱ्या मडगावच्या प्रभाग सातमधील उमेदवार आर्थुर डिसिल्वा यांच्याविरोधात फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याविरुद्ध सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रतापराव गावकर यांनी तक्रार दिली आहे.

हेही वाचा