आणखी १२ बळी; १५ डॉक्टरांना करोना!

राज्यातील बाधितांत १,४२० जणांची भर; सक्रिय ११ हजारांवर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April 2021, 11:33 pm
आणखी १२ बळी; १५ डॉक्टरांना करोना!

पणजी : राज्यातील करोना मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी आणखी १२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर नवे १,४२० बाधित रुग्ण सापडले. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या राज्यातील आठ डॉक्टरांनाही करोनाची लागण झाली असून, इतर आठ जणांत लक्षणेही दिसून येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
करोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या एकूण १५ डॉक्टरांना करोनाची लागण झाली असून, आणखी आठ डॉक्टरांत लक्षणे दिसत आहेत. त्यांचे करोना चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. याची दखल घेऊन सरकारने तत्काळ कोविडचा संसर्ग झालेल्या डॉक्टरांंसाठी राहण्याची वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी डॉक्टरांच्या गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (जीएआरडी) या संघटनेने राज्य आरोग्य सचिवांकडे केली आहे.
दरम्यान, बारा बळींमुळे राज्यातील आतापर्यंतच्या एकूण मृतांचा आकडा ९७६ झाला आहे. गुरुवार आणि शुक्रवारच्या चोवीस तासांत ५९६ जणांनी करोनावर मात केली. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या ११,०४० झाली आहे. अजूनही बाधितांचा आकडा वाढताच आहे. त्यामानाने करोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या मात्र कमी असल्याने राज्याचा करोनातून बरे होणाऱ्यांचा दर घटतच चालला आहे. शुक्रवारी हा दर ८३.६८ टक्क्यांवर आला आहे.
गुरुवार आणि शुक्रवारच्या चोवीस तासांत सहा पुरुष आणि सहा महिलांचा मृत्यू झाला. त्यात पेडणे येथील ७०, वास्को येथील ७७, शिवोली येथील ५५, अंजुणा येथील ८५, कळंगुट येथील ६२ व सिंधुदुर्ग येथील २४ वर्षीय पुरुषाचा, तर सांतइस्तेव्ह येथील ६५, बार्देश येथील ४९, कुडचडे येथील ६७, कळंगुट येथील ५६, कोलकाता येथील ५१ आणि डिचोली येथील ५७ वर्षीय महिलेचाही समावेश आहे.
कांदोळीने गाठला हजारांचा टप्पा
मडगावनंतर कांदोळी येथील सक्रिय बाधितांची संख्या एक हजार झाली आहे. सद्यस्थितीत सक्रिय बाधितांत मडगाव (१,१६६) आघाडीवर आहे. त्यानंतर कांदोळी (१,०००), पर्वरी (९४२), वास्को (६९३), पणजी (६८५), म्हापसा (६५५), कुठ्ठाळी (६३०), फोंडा (५४३) या शहारांचा सर्वाधिक सक्रिय बाधितांत क्रमांक लागतो.

हेही वाचा