Goan Varta News Ad

प्रियोळात दीपक ढवळीकरांचा प्रचार सुरू

विधानसभा निवडणुकीची तयारी : मंत्री गोविंद गावडेही सक्रिय

|
23rd April 2021, 12:45 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता
फोंडा : विधानसभा निवडणुकीला किमान वर्षभराचा कालावधी आहे. मात्र काही इच्छुकांनी आपल्या मतदारसंघात प्रचारास प्रारंभ केला आहे. विद्यमान आमदारांनीही आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसत आहे. खास करून प्रियोळ मतदारसंघात माजी आमदार दीपक ढवळीकरांनी प्रचाराला सुरुवात केल्यामुळे विद्यमान आमदार तथा मंत्री गोविंद गावडे अधिकच सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
प्रियोळ मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेल्या दीपक ढवळीकरांचा गेल्या निवडणुकीत गोविंद गावडे यांनी पराभव केला होता. आता ढवळीकरांनी पुन्हा प्रियोळमधून निवडणूक लढवण्याची घोषणा करून त्या दृष्टीने कामालाही सुरुवातही केली आहे. यानंतर विद्यमान आमदार गोविंद गावडे यांनी मतदारसंघात विकासकामे करण्याचा सपाटा लावल्याची चर्चा आहे. आपल्या आमदारकीच्या काळात ढवळीकर यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली. त्यांनी आपल्या माधवराव ढवळीकर ट्रस्टमार्फत मतदारसंघातील बहुतांश लोकांना आर्थिक व तत्सम मदत केली. मागील निवडणुकीत त्यांच्या पराभवाची कारणे अनेक असली तरी सध्या त्यांनी प्रचारकार्यास सुरुवात केली असून मागील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने त्यांनी कोपरा बैठका घेणे, गरजूंना मदत करणे सुरू केले आहे.
विद्यमान आमदार गोविंद गावडे यांनीही आपल्या चार वर्षांच्या काळात भरीव कार्य केले आहे. येत्या निवडणुकीतही मतदारांचा कौल आपणास मिळण्याची त्यांना खात्री आहे. मात्र ढवळीकरांनी मतदारसंघात कामास सुरुवात केल्यापासून मंत्री गावडे अधिकच सक्रिय बनले आहेत. अन्य कामांना फाटा देऊन ते अधिकांश वेळ मतदारसंघातच घालवत आहेत. दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
सध्या दिग्विजय वेलिंगकर हे माजी आमदारपुत्रही मतदारसंघात कामाला लागले असून त्यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या घोषवाक्याला युवा वर्गाचा चांगला पाठिंबा मिळत आहे. विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटवला असून त्यांची उमेदवारीही आजी-माजी आमदारांना अडचणीत आणू शकते, असे बोलले जात आहे.