Goan Varta News Ad

मोपा जोडरस्त्याला विरोध करणाऱ्या ५० जणांविरुद्ध गुन्हे

|
22nd April 2021, 06:54 Hrs

‍‍‍पेडणे : मोपा जोडरस्त्याला विरोध करणाऱ्या ५० नागरिकांविरुद्ध मंगळवारी पेडणे पोलीस स्थानकात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याच प्रकरणी १९ फेब्रुवारी रोजी ६५ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकारामुळे पेडण्यात अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यास तो दडपून टाकण्याचा प्रकार सुरू असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांतून उमटू लागली आहे.
धारगळ, नागझर येथून राष्ट्रीय महामार्गावरून मोपा विमानतळावर जाण्यासाठी जोडरस्ता बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी अनेकांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. याला जमीन मालकांचा तीव्र विरोध आहे. १९ फेब्रुवारी रोजी भूसर्वेक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी आंदोलन करून अडवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी ६५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर सोमवारी पुन्हा त्याच ठिकाणी आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी ५० जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पेडणे पोलिसांवर दगडफेक केल्याची तक्रार पोलीस उपनिरीक्षक प्रफुलगिरी यांनी दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विवेक यांनी एकूण ५० शेतकऱ्यांवर गुन्हे नोंद केले. सरकारी कामात अडथळा आणि पोलिसांवर दगडफेक केल्याच्या कलमांखाली हे गुन्हे नोंद केले आहेत. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पण हा प्रकार म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला दडपण्याचा आहे, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
येथील शेतकऱ्यांची शेता, बागायतीची जमीन सरकारने रस्त्यासाठी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आपल्या पूर्वजांच्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी मागच्या अडीच महिन्यांपासून रस्त्यावर आले आहेत. वास्तवात आराखडा बनवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. जनसुनावणी घेऊन शेतकऱ्यांची मते ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र, ते न करता सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे.