एअर इंडियाकडून ब्रिटन विमानसेवा बंद

- ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू

Story: अग्रलेख |
22nd April 2021, 12:41 am
एअर इंडियाकडून ब्रिटन विमानसेवा बंद

दिल्ली : भारतात करोनाचे रुग्ण आणि त्यामुळे होणारे मृत्यू या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर इतर काही देशांनी भारतातून येणाऱ्या किंवा भारतात जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. आता एअर इंडियाने ब्रिटनला जाणाऱ्या आणि ब्रिटनहून येणाऱ्या आपल्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. २४ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान नवे निर्बंध लागू असणार आहेत. एअर इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने घातलेल्या निर्बंधांनंतर भारतातील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. एअर इंडियाने बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि ब्रिटन यादरम्यान प्रवास करणार असलेल्या प्रवाशांनी नोंद घ्यावी की यूकेकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यूकेला जाणाऱ्या किंवा यूकेहून येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट्स २४ एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. तिकिटांच्या परताव्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यान, २४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये दिल्ली आणि मुंबईहून यूकेला जाणारी एक फ्लाईट आठवड्यातून एकदा पाठवण्याचा विचार सुरू असून, त्यासंदर्भात लवकरच कळवले जाईल, असेही एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
............................................................................
२४ तासांत दोन हजारांहून
अधिक बाधितांचा मृत्यू

दिल्ली : देशात करोनाचा कहर वाढत आहे. गेल्या २४ तासांत दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार ५५३ इतकी झाली आहे; तर रुग्णसंख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३०वर पोहोचली आहे.
एका दिवसात २ लाख ९५ हजार ४१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत; तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
करोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ६२ हजार ९७ रुग्णांची नोंद झाली. यानंतर उत्तर प्रदेश (२९ हजार ५७४), दिल्ली (२८ हजार ३९५), कर्नाटक (२१ हजार ७९४)आणि केरळचा (१९ हजार ५७७) समावेश आहे. देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या रुग्णसंख्येत या पाच राज्यांचा मोठा वाटा आहे. ५४.७२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत. तसेच २४ तासांत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र (५१९) आणि दिल्लीत (२७७) झाले आहेत.
.............................
कर्नाटकात नाईट कर्फ्यू
बंगळुरू : कोविडच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकनेही नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, राज्यात २१ एप्रिल ते ४ मे पर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहील. राज्यात रात्री ९.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू सुरू राहील. तसेच प्रत्येक विकेन्डला संपूर्ण दिवस कर्फ्यू सुरू राहील. या दरम्यान नागरिकांना अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असेल.
रात्री ९ वाजल्यानंतर सर्व मॉल आणि दुकानं बंद राहतील. याशिवाय शिक्षण संस्था, जिम आणि स्पा देखील बंद राहतील. स्विमिंग पूल केवळ ट्रेनिंगसाठी खेळाडूंसाठी उघडले जातील.