राजस्थान रॉयल्सचा आज बंगळुरूशी सामना


22nd April 2021, 12:34 am

मुंबई : आत्मविश्वासाने खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये विजयाची गती कायम ठेवण्याच्या उद्देशाने गुरुवारी राजस्थान रॉयल्स (आरआर) विरुद्ध मैदानात उतरणार आहे. आरसीबीने आतापर्यंत एकही सामना न गमावता सलग तीन विजय नोंदविले आहेत.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सचाही पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने त्यांच्या तीन सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनचा संघ सहाव्या स्थानावर घसरला असून त्यांना दुसऱ्या विजयाची प्रतीक्षा आहे. राजस्थानचा संघ सांघिक कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे. सॅमसनने पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. मात्र, ते जिंकू शकले नव्हते.
मागील सामन्यात सलामीवीर जोस बटलर चेन्नईविरुद्ध चांगली फलंदाजी करत होता. परंतु, इतर फलंदाजांचा त्याला पाठिंबा मिळाला नाही. राजस्थानला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर संघाला एकजुटीने कामगिरी करावी लागेल. राजस्थानच्या गोलंदाजांनीही निराश केले आहे. दिल्ली कॅपिटल्स बरोबरचा सामना सोडला, तर रॉयल्सच्या गोलंदाजांनी बऱ्याच धावा दिल्या आहेत. दिल्लीविरुद्ध केवळ जयदेव उनादकटने १५ धावांत तीन गडी बाद केले, तर युवा चेतन साकारियाने प्रभावित केले. जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत ख्रिस मॉरिस आणि बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांसारख्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, आरसीबीसाठी अनुभवी एबी डिव्हिलियर्स आणि सध्याच्या मोसमात संघाशी जोडलेल्या ग्लेन मॅक्सवेलने चांगली कामगिरी केली आहे. डिव्हिलियर्सने मागील हंगामातील कामगिरी या हंगामातही सुरू ठेवली आहे, तर मॅक्सवेलमुळे मधली फळी आणखी मजबूत झाली आहे. कोहलीने काही सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. पण, मोठा डाव खेळण्यात तो अपयशी ठरला.
‍‍गेल्या हंगामात प्रभावित करणारा युवा फलंदाज देवदत्त पड्डीकलला अद्याप प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. दोन सामन्यांतील अपयशानंतर रजत पाटीदार अधिक चांगले काम करण्यास तयार आहे. आरसीबीची गोलंदाजी अधिक भक्कम दिसत आहे. वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे ५.७५ आणि ५.८१ च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. पटेलने मुंबईविरुद्ध पाच गडी बाद केले, तर डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमदने एका षटकात सनरायझर्सविरुद्ध सात धावांत तीन गडी बाद करत सामन्याचे चित्रच बदलून टाकले होते.
आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चारऐवजी तीन परदेशी खेळाडूंना खेळवले होते. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात कोहली मागील विजयी संघ खेळवतो की लेगस्पिनर अ‍ॅडम जम्पा, वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन आणि अनुभवी अष्टपैलू डॅनियल ख्रिश्चन यांना संधी देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आजचा सामना
रॉयल चॅलेंजर्स, बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स
वेळ : सायं. ७.३० वा. स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स