नाशिकात ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

घटनेची होणार उच्चस्तरीय चौकशी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत


21st April 2021, 11:51 pm
नाशिकात ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

फोटो : झाकीर हुसेन रुग्णालय आवारात ऑक्सिजन गळती होत असलेला टँकर आणि बचाव पथक.
नाशिक : येथील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी सकाळी ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. आणखी काही रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरू झाली.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे अधिक माहिती देताना म्हणाले, ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व लिकेज झाला होता. त्यामुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला ऑक्सिजन लीक होणे हेच कारण आहे. त्यामध्येही प्रशासन आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन काम केले. ऑक्सिजन लीक झाल्यामुळे परिसरात ऑक्सिजनचे व्हेपर्स झाले होते. त्यामुळे काहीच दिसत नव्हते. तिथल्या लोकांनी तातडीने व्हॉल्व तोडून तो बंद केला. टाकीमध्ये उरलेला २५ टक्के ऑक्सिजन वाचवला. वेल्डिंग केले आणि लिक्विड ऑक्सिजन टँक पुन्हा भरला आणि पुढे सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. पण ही घटना मनाला वेदना देणारी आणि दुर्दैवी आहे.दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी झाली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
__
उच्चस्तरीय समितीकडून होणार चौकशी
या घटनेची सात सदस्यीय उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होणार आहे. या समितीमध्ये नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे अध्यक्ष असतील. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. पु. ना. गांडाळ हे सदस्य असतील. त्याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉ. प्रमोद गुंजाळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव राठे, महानगर पालिकेचे अभियंता संदीप नलावडे, एफडीएच्या सहाय्यक संचालक माधुरी पवार आणि ऑक्सिजन प्लांट बसवण्याे काम करणारे हर्षल पाटील हे या समितीचे सदस्य असतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
नाशिकमधील ऑक्सिजन गळती झाल्याने घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत लोकांना प्राण गमावावे लागल्याने मला प्रचंड दु:ख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या सद्गभावना मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.
_ नरेंद्र मोदी, पंतप्रधान