दिल्ली विरुद्ध आज राजस्थानला विजयाची अपेक्षा


15th April 2021, 12:09 am

मुंबई : दुखापतग्रस्त बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सचा सामना गुरुवारी गत उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सशी होणार अाहे. राजस्थानचा नवीन कर्णधार संजू सॅमसनकडून याही सामन्यात आणखी एका प्रेरणादायी डावाची आणि विजयाची अपेक्षा केली जात आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थानला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने आपल्या नवोदित कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली शानदार सुरुवात करताना आपल्या पहिल्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर‌किंग्सचा सात गड्यांनी पराभव केला. परंतु, राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य गाठताना केवळ चार धावांनी पराभव स्वीकारला. पंजाबच्या २२२ धावांच्या विशाल खेळीचा पाठलाग करताना रॉयल्सच्या संघाचा कर्णधार सॅमसनने यावर्षी आयपीएलमधील पहिल्याच शतकासह (६३ चेंडूत ११९ धावा) सामन्यावर शेवटपर्यंत आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र, विजयासाठी १ चेंडूत केवळ पाच धावांची आवश्यकता असताना सॅमसन झेलबाद झाला. ‍पहिल्या सामन्यात राजस्थानचेे मनन वोहरा (१२), बटलर (२५), दुबे (२३) आणि पराग (२५) चांगली खेळी करू शकले नाहीत. रॉयल्स संघासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे गोलंदाजी. पहिल्या सामन्यात संघाचे गोलंदाज अजिबात लयीत दिसत नव्हते.
पदार्पणाच्या सामन्यात ३१ धावा देऊन तीन बळी घेणारा युवा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाशिवाय रॉयल्सचे गोलंदाज मुस्तफिजुर रहमान, ख्रिस मॉरिस, बेन स्टोक्स, श्रेयस गोपाळ आणि राहुल तेवतिया यांच्या विरुद्ध धावा करण्यात पंजाबच्या फलंदाजांना काहीच अडचण आली नाही. मात्र, पुढील सामन्यात या सर्वांना त्यांची कामगिरी सुधाररावी लागणार आहे.
दुसरीकडे मागील उपविजेता दिल्लीच्या संघाने पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी करत तीन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सहज विजय नोंदविला. सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८८ धावा केल्या. परंतु, सलामीवीर शिखर धवन (८५) आणि पृथ्वी शॉ (७२) यांनी पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केल्यामुळे दिल्लीने सहज विजय मिळविला. गोलंदाजीबाबत पहिल्या सामन्यात ख्रिस वॉक्स आणि अावेश खान यांनी सर्वांनाच प्रभावित केले आणि आगामी सामन्यातही त्यांचा हा फॉर्म टिकून रहाण्याची अपेक्षा आहे. रविचंद्रन अश्विन, टॉम क्रेन, अमित मिश्रा आणि मार्कस स्टोइनिस या गोलंदाजांनी मात्र निराश केले. या सामन्यात त्यांच्याकडून चांगले खेळीची अपेक्षा केली जात आहे.
किंग्स पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर राजस्थानला आणखी एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू स्टोक्सच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे. स्टोक्सच्या अनुपस्थितीत जोस बटलर, शिवम दुबे आणि रायन पराग या खेळाडूंवर अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी आणि कर्णधाराला पाठिंबा देण्यासाठी दबाव रहाणार आहे.
एनरिक नॉर्त्जेला करोना; दिल्लीला धक्का
आयपीएल २०२१ च्या उपविजेतेपदाचे दावेदार दिल्ली कॅपिटल्स संघाला धक्का बसला आहे. संघातील मुख्य जलद गोलंदाज एनरिक नॉर्त्जेला करोनाची लागण झाली आहे. दिल्ली संघाने आयपीएलच्या १४व्या हंगामात पहिल्याच लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत धमाकेदार सुरुवात केली होती. दिल्ली कॅपिटल्स संघासाठी या वर्षीचा हंगाम अवघड असल्याचे दिसत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यानंतर पहिल्या सामन्याआधी फिरकीपटू आणि अष्टपैलू अक्षर पटेल यालाही करोनाची लागण झाली. आधीच नियमित कर्णधार नाही त्यात मुख्य खेळाडू संघाबाहेर असल्याने दिल्ली संघाला मोठा झटका बसला आहे.
...........
आजचा सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कॅपिटल दिल्ली
वेळ : सायं. ७.३० वा.
स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क