कालिका इलेव्हनला दैवज्ञ प्रीमियर लिगचे जेतेपद


15th April 2021, 12:08 am

डिचोली : युनायटेड दैवज्ञ क्लब-म्हापसा आयोजित अखिल गोवा द्वितीय स्पर्धा दैवज्ञ प्रीमियर लीग २०२१चे विजेतेपद कालिका इलेव्हनने नागवेकर स्मॅशर्सचा पराभव करून पटकावले. या स्पर्धेत १० संघ सहभागी झाले होते. लिलावाद्वारे क्रिकेट खेळाडूंची निवड करण्यात आली होती. तीन दिवस सदर स्पर्धा हळदोणा-बार्देश येथील किटला मैदानावर खेळवण्यात आली होती.
या स्पर्धेतील अंतिम सामना कालिका इलेव्हन व नागवेकर स्मॅशर्स यांच्यात झाला. त्यात कालिका इलेव्हन, पेडणेचा कर्णधार यश शिरोडकरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर नागवेकर स्मॅशर्सने फलंदाजी करीत ८ षटकांत ६२ धावा केल्या. त्यामध्ये आशिष हिर्लोस्कर २० धावा व अमृत वेर्लेकर यांनी १६ धावा केल्या तर संजय नागवेकर यांनी तीन षटकांत २१ धावांत ४ गडी बाद केले, तर यशवंत शिरोडकर यांनी एका षटकात तीन धावा देत दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात खेळताना कालिका इलेव्हनने ७.३ षटकांत हा विजय संपादन केला. त्यात लक्ष्मीकांत शिरोडकर यांनी ३२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला विजयी केले.
दरम्यान, कालिका इलेव्हनने रोख तीस हजार रुपये आणि आकर्षक चषक मिळविला, तर उपविजेत्या नागवेकर स्मॅशर्सला रोख रुपये वीस हजार व आकर्षक चषक देण्यात आला. सदर स्पर्धेतील रोख रक्कम व बक्षिसे अंता ज्वेलर्स, मडगाव व एम. एस. लोटलीकर, वास्को तसेच अमन लोटलीकर यांनी एकूण चषक पुरस्कृत केले होते.
बक्षीस वितरणात सामनावीर- लक्ष्मीकांत शिरोडकर (कालिका इलेव्हन), उत्कृष्ट फलंदाज- आशिष हिर्लोस्कर (नागवेकर स्मॅशर्स), उत्कृष्ट गोलंदाज- संजय नागवेकर (कालिका इलेव्हन), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- साईश हळदणकर (मडगाव स्ट्रायकर्स), १९ वर्षाखालील उदयोन्मुख खेळाडू- मिथिल लोटलीकर (मडगाव स्ट्रायकर्स), तर मालिकावीर म्हणून अमृत वेर्लेकर नागवेकर यांना सन्मानित करण्यात आले.
रामदास साळकर (मान्यताप्राप्त पंच व स्कोरर), पूजा उसपकर (गोवा राज्य महिला क्रिकेट संघ-सदस्य), तेजस नागवेकर (फिफा मान्यताप्राप्त रेफरी) यांच्या असामान्य योगदान व क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पुरुषोत्तम पेडणेकर (आर्थिक विकास महामंडळ- राज्य सरकार, डायरेक्टर), अमन लोटलीकर (मालक अँड्रॉइड इंजीनियरिंग), युनायटेड क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत रायकर, पी पेडणेकर, दत्तप्रकाश वेर्णेकर, रामदास साळकर, क्लबचे सचिव महादेव मालवणकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज नागवेकर यांनी केले. तर महादेव मालवणकर यांनी आभार मानले.