पंजाबचा रोमांचक विजय

राजस्थानचा चार धावांनी पराभव :संजूचे वादळी शतक व्यर्थ


13th April 2021, 12:32 am

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचे वादळी शतक फुकट गेले. रोमांचक अशा सामन्यात पंजाब किंग्सचा ४ धावांनी विजय झाला. पंजाबने ठेवलेले २२२ धावांचे आव्हान गाठताना राजस्थानला २० षटकांत ७ बाध २१७ धावाच करता आल्या. शेवटच्या बॉलला ५ धावांची गरज असताना संजू सॅमसन ११९ धावांवर बाद झाला. ६३ चेंडूंमध्ये केलेल्या या खेळीमध्ये सॅमसनने १२ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याला बटलरने २५, रियान परागने २५ धावा करत चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला पण, त्यांना मोठी खेळी करता आली नाही. पंजाबकडून अर्शदीपने ३ तर मोहम्मद शामीने २ विकेट घेतल्या.
पंजाब किग्जने ठेवलेल्या २२२ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्सला पहिल्याच षटकात गमावले. स्टोक्स बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर मनन वोराही १२ धावांची भर घालून माघारी परतला त्यामुळे राजस्थानची ३.२ षटकात २ बाद २५ धावा अशी बिकट अवस्था झाली होती. पण, कर्णधार संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी डाव सावरत भागिदारी रचण्यास सुरुवात केली. सॅमसन बॉल टू रन रणनितीने खेळत होता तर बटलरने पॉवर प्लेचा फायदा उचलत आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २६ चेंडूत ४५ धावांची भागिदारी रचली आणि संघाला ७ षटकात ७० धावांपर्यंत पोहचवले. पण, झाय रिचर्डसनने आक्रमक बटलरचा २५ धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. बटलर बाद झाल्यानंतर सॅमसनने शिवम दुबेबरोबर चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागिदारी रचली. पण, ही जोडी अर्शदीप सिंगने दुबेला बाद करत फोडली. मात्र सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण करत पराग बरोबर भागिदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी राजस्थानला १५ व्या षटकात १५० चा टप्पा पार करून दिला. सॅमसनने धडाकेबाज फलंदाजी करत ५४ चेंडूत शतक ठोकले. हंगामातील हे पहिले शतक आहे. या शतकामुळेच पंजाबचे २२२ धावांचे टार्गेट राजस्थानच्या आवाक्यात आले. राजस्थानला आता विजयासाठी १२ चेंडूत २१ धावांची गरज होती. पण, दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा तेवतिया २ धावा करून बाद झाला. दरम्यान, अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १३ धावांची गरज होती. स्ट्राईकवर होता तो संजू सॅमसन. अखेरचे षटक टाकणाऱ्या अर्शदीपचा पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर संजूने दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेतली. आता चार चेंडूत १२ धावांची गरज होती. स्ट्राईकवर होता मॉरिस त्याने १ धाव काढून संजूकडे स्ट्राईक दिला. आता ३ चेंडूत ११ धावांची गरज होती. संजूने चौथ्या चेंडूवर षटकार मारत हे इक्वेशन २ चेंडूत ५ धावा असे आणले. पण, पाचव्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही. त्यामुळे १ चेंडूवर ५ धावा असे सामन्याचे चित्र झाले. अखेरच्या चेंडूवर सॅमसनने चेंडून हवेत उंच टोलवला पण, तो थेट दीपक हुड्डाच्या हातात गेला. त्यामुळे ६३ चेंडूत ११९ धावांची सॅमसन खेळी संपुष्टात आली आणि राजस्थानच्या विजयाची आशाही मावळली.
पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी पहिल्याच सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. कर्णधार लोकेश राहुल, ख्रिस गेल, दीपक हुडा यांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळेच पंजाबच्या संघाला राजस्थानपुढे २२२ धावांचे तगडे आव्हान ठेवता आले. आतापर्यंतच्या आयपीएलमधील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. कारण आतापर्यंत एकाही संघाला या आयपीएलमध्ये २०० धावांचा टप्पा गाठता आला नव्हता.
राजस्थानने नाणेफेक जिंकली आणि पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर मयांक अगरवालला यावेळी राजस्थानचा युवा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाने बाद केले आणि पंजाबला पहिला धक्का दिला. मयांकला यावेळी १४ धावांवर समाधान मानावे लागले.
मयांक बाद झाल्यावर ख्रिस गेल फलंदाजीला आला आणि त्यानंतर त्याने कर्णधार लोकेश राहुलच्या साथीने राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलने आयपीएलमधील ३५०वा षटकार खेचला. आयपीएलमध्ये आतापर्यंत एवढे षटकार कोणत्याही फलंदाजाला फटकावता आलेले नाहीत. त्यामुळे गेलचा हा विक्रम कोण मोडू शकेल का, याची उत्सुकता सर्वांना असेल. पण गेलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. कारण रायन परागने बेन स्टोक्सकरवी गेलला बाद केले, गेलने यावेळी २८ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४० धावा केल्या. या सामन्यात गेलला एकदा आणि राहुलला दोनदा जीवदान मिळाले.
गेल बाद झाल्यावर राहुल आणि दीपक हुडा यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली. राहुलने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण राहुलपेक्षा यावेळी हुडा जास्त आक्रमक फलंदाजी करत होता. हुडाने २० चेंडूंमध्येच आपले अर्धशतक साजरे केले. अर्धशतक पूर्ण करताना हुडाने २८ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ६४ धावांची तुफानी खेळी साकारली.
गेलचा ३५० षटकारांचा विक्रम
या सामन्यात राहुल तेवतियाने स्वतःच्याच गोलंदाजीवर ख्रिस गेलचा झेल सोडला. त्यानंतर गेलने या सामन्यात मोठा विक्रम केला असून आयपीएलमध्ये हा विक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. गेलने आयपीएलमध्ये ३५० षटकारांचा विक्रम केला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स (२३७), महेंद्रसिंग धोनी (२१६), रोहित शर्मा (२१४), विराट कोहली (२०१) यांचा क्रमांक लागतो.
.......
धावफलक :
पंजाब : २० षटकांत ६ बाद २२१ धावा. 
राजस्थान : २० षटकांत ७ बाद २१७ धावा.