हॉस्पिटॅलिटी उद्योगातील कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य द्या

तज्ज्ञांची सरकारकडे मागणी : पर्यटक, नागरिकांच्या सुरक्षेसह अर्थचक्र गतिमान राहणे आवश्यक


09th April 2021, 12:41 am
हॉस्पिटॅलिटी उद्योगातील कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य द्या

गौरीश धोंड, नीलेश शहा, क्रुज कार्दोज

पणजी : राज्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे आकडे पाहता राज्यात करोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे जसे सरकारने प्राधान्याने ज्येष्ठ नागरिक आणि कोविड योद्ध्यांना लस दिली, तसेच लसीकरणात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कामगारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे, अशी मागणी या उद्योगातील तज्ज्ञांनी केली आहे.
पंचतारांकित हॉटेल्स, टॅक्सी व्यावसायिक, बस चालक-वाहक, शॅक्स व्यावसायिक यांचा थेट नागरिकांशी संबंध येतो. या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांचा पर्यटकांशीही संपर्क येतो. सध्या राज्यात टाळेबंदी, सीमाबंदी अथवा संचारबंदी नाही. यामुळे हळूहळू पर्यटक राज्यात येत आहेत. पर्यटकांना रोखल्यास हॉटेल्स, शॅक्स, टॅक्सी व्यवसाय ठप्प होईल. यातून अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. ही अर्थव्यवस्था कोलमडू नये, यासाठीच राज्य सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतलेला नाही. हे रास्त असले तरी बाहेरून येणार, विशेषतः पर्यटकांमार्फत करोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणूनच हॉटेल्स, शॅक्स, बसेस चालवणारे वाहक-चालक, टॅक्सीवाले यांना प्राधान्याने लस देणे गरजेचे आहे. सरकारने त्वरित हॉस्पिटॅलिटी उद्योगातील कर्मचाऱ्यांना लस देण्याचा आदेश जारी करण्याची गरज आहेत.
हॉस्पिटॅलिटी कर्मचाऱ्यांना लस देण्याशिवाय पर्याय नाही : गौरीश धोंड
- हॉटेलमध्ये पर्यटक येत असतात. शिवाय काही कामानिमित्ताने बाहेरील लोकही हॉटेलमध्ये येत असतात. हॉटेल व्यवस्थापन व अन्य कर्मचारी यांच्याशी त्यांचा थेट संबंध येतो. म्हणून या कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्याची गरज आहे. वास्तवात अर्थचक्राला गती देणाऱ्या या क्षेत्रातील कामगारांना यापूर्वीच लस देण्याची आवश्यकता होती.
- सरकारने आता ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू आहे. हॉटेल उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्यास हरकत नाही. याशिवाय कदंबचे चालक आणि वाहक, टॅक्सीवाले, पेट्रोल पंपावरील कर्मचारी अशांनाही प्राधान्याने लस द्यायला हवी. कारण यांचा थेट संबंध सामान्य नागरिकांशी येत असतो.
- कदंबच्या वाहकांचा आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचा दिवसाकाठी हजारो नागरिकांशी थेट संबंध येतो. यामुळे कोविड काळात तेही फ्रंटलाईनवरच सेवा बजावत आहेत. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत त्यांना कोविड लस देणे गरजेचे आहे. जेणेकरून संभाव्य संकट टळेल.
पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी सुरक्षित असणे हिताचे :
नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

- कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरी, परिस्थिती गेल्या वर्षापेक्षा चांगली आहे. आता प्रतिबंधात्मक लस आली आहे. शिवाय कोणती काळजी घ्यावी आणि कसे उपचार घ्यावेत, याची माहिती झाली आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाल्यास त्यांच्यात प्रतिकारक्षमता तयार होईल. लसीचा दुष्परिणाम होत नाही, हेही सिद्ध झाले आहे.
- सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चाचण्याचा वेग वाढवण्याबरोबरच लसीकरणाचा वेगही वाढवावा लागेल. हॉटेल कर्मचारी, टॅक्सीवाले, कदंब तसेच खासगी बसेसचे वाहक यांचा सामान्य लोकांशी व पर्यटकांशी थेट संबंध येत असतो. यामुळे या क्षेत्रातील सर्वांनाच प्राधान्याने लस देणे गरजेचे आहे.
- अर्थचक्र सुरळीत चालण्यासाठी हॉटेल्सपासून पर्यटन क्षेत्रातील सर्वच उद्योग सुरू राहणे आवश्यक आहे. म्हणून या उद्योगातील कर्मचारी सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना प्राधान्याने लस दिली पाहिजे. म्हणनूच टीटीएजीने सरकारला तशा मागणीचे निवेदन एक महिन्यापूर्वीच पाठवले आहे. अजून त्यावर काहीच निर्णय झालेले नाही.
पर्यटकांची सुरक्षाही महत्त्वाची : क्रुज कार्दोज,
अध्यक्ष, शॅक्स मालक कल्याण सोसायटी

- हॉटेल्स तसेच शॅक्समधील कर्मचाऱ्यांचा थेट पर्यटक व लोकांशी संपर्क येत असतो. सध्या पर्यटकांची संख्या जास्त नाही. पण ते हळूहळू येत आहे. त्यांची संख्या वाढत आहे. पर्यटकांना सांभाळण्याची गरज आहे. कर्मचारी आणि पर्यटक या दोघांच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस देणे गरजेचे आहे.
- हॉटेल्स, शॅक्स, टॅक्सीवाले, बसेसचे वाहक हेदेखील फ्रंटलाईन कर्मचारीच ठरतात. कारण यांच्यावर अर्थव्यवस्था उभी आहे. म्हणून या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याची व्यवस्था सरकारजवळ असायला हवी. करोनाचा उद्रेक झाला असल्याने याची नितांत गरज आहे. तरच करोनावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

हेही वाचा