अंगणवाडीच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य

नावेली आपच्या उमेदवार माटिल्डा डिसिल्वा यांचे आश्वासन


07th March 2021, 12:01 am

पणजी : अंगणवाडी आणि मोहल्ला क्लिनिक याविषयीच्या समस्यांना आपले प्राधान्य राहील, असे आश्वासन आपच्या नावेली जिल्हा पंचायतीच्या उमेदवार माटिल्डा डिसिल्वा यांनी दिले आहे. त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच धडाक्यात केला. त्या वेळी त्या बोलत होत्या.
माटिल्डा यांनी नावेलीमधील अंगणवाड्यांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधले. यात बर्‍याच अंगणवाड्यांना वीजपुरवठा नाही आणि काहींना पिण्याच्या पाण्याचे कनेक्शनही नाही. अंगणवाड्यांमध्ये मुलांना दिला जाणाऱ्या आहाराची गुणवत्ताही शंकास्पद आहे. मुलांना जमिनीवर बसावे लागते. काही अंगणवाड्यांमध्ये छतावरील कौले फुटल्यामुळे पावसाळ्यात गळते. आपण निवडून आल्यानंतर दिल्लीतील अंगणवाड्यांप्रमाणे जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये असणाऱ्या अंगणवाड्या केल्या जातील.
नावेलीधील आरोग्य सेवांत सुधारणा आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर प्रत्येक प्रभागात दिल्लीसारख्या मोहल्ला क्लिनिक उभारण्याचा मी प्रयत्न करेन, असेही त्या म्हणाल्या.