सीझेडएमपी नाकरण्याचा ठराव संमत

सांकवाळ ग्रामसभेचा निर्णय : जनतेचे म्हणणे ऐकण्याचे आवाहन


06th March 2021, 11:59 pm
सीझेडएमपी नाकरण्याचा ठराव संमत

फोटो : ग्रामसभेत बोलताना सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर. सोबत नवीन झा व इतर. (अक्षंदा राणे)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
वास्को : सांकवाळच्या खास ग्रामसभेत किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) मसुदा एकमतांनी नाकारण्यासंबंधी ठराव घेण्यात आला. सरपंच रमाकांत बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या या ग्रामसभेला सांकवाळ जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवीन झा, पंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
सांकवाळ जैवविविधता व्यवस्थापन समितीने ग्रामस्थांसमवेत चर्चा करून तयार स्वतःचा आराखडा तयार केला होता. तो आराखडा प्रशासनाला सादर करण्यात आला होता. त्या आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या गोष्टींचा मसुदामध्ये उल्लेख नाही. पंचायतीच्या आराखड्याची दखल न घेतल्याबद्दल आश्र्चर्य व्यक्त करण्यात आले. या ग्रामसभेत किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा मसुदासंबंधी चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सदर मसुदा नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. मसुदा नाकारण्यात आल्यासंबंधी पंचायतीतर्फे स्पष्टीकरण देण्यासाठी किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण विभाग वगैरेंकडून अधिक वेळ मागण्यासंबंधी पत्र लिहिण्याचा ठराव घेण्यात आला. तज्ज्ञांची मदत घेऊन ग्रामस्थ व संबंधितांच्या सहकार्याने नवीन आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच बोरकर म्हणाले, मसुदामध्ये घरे, फिशिंग जेटी वगैरे दाखविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही विरोध केला आहे. सरकारच्या तज्ज्ञांनी येथे येऊन लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे.
आराखड्याबाबत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : काब्राल
पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल म्हणाले, आराखडा मसुदा हा घरे, जेटी वगैरे दाखविण्यासाठी नसून तो आपत्कालीन, त्सुनामी संबंधित आराखडा आहे. कोठे वालुका टेकड्या, खारफुटी, दलदल आहेत त्याचा समावेश यात केला आहे. तसेच पोर्ट एरिया असा उल्लेख करण्यात आला आहे त्यासंबंधी माहिती द्यावी असे पत्र आम्ही संबंधित विभागाला लिहिले आहे. गोव्यात एमपीटी व पणजी असे दोन पोर्ट आहेत. त्यामुळे सदर पोर्ट एरिया कोणाची हे स्पष्ट होण्याची गरज आहे. काहीजण या आराखड्यावर लोकांची नाहक दिशाभूल करत आहेत.