वास्कोत अंतिम दिवशी ८० उमेदवारांचे ८४ अर्ज


06th March 2021, 11:57 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता
वास्को : उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी ८० उमेदवारांनी ८४ उमेदवारी अर्ज दाखल केले. मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शनिवारी उमेदवारांची एकच गर्दी दिसून आली. शुक्रवारी ६४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
प्रभाग २३ महिलांसाठी राखीव झाल्याने मावळते नगरसेवक श्रीधर मार्दोळकर यांनी प्रभाग १ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी प्रभाग दोन, माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर यांनी प्रभाग आठ, माजी नगराध्यक्ष मनेष आरोलकर यांनी प्रभाग सोळा, माजी नगराध्यक्ष सैफुल्ला खान यांनी प्रभाग बारा, माजी नगराध्यक्ष अर्चना कोचरेकर यांनी प्रभाग तीन, माजी नगराध्यक्ष सुचिता शिरोडकर यांनी प्रभाग दहामधून उमेदवारी अर्ज दाखल केले.
नीलेश नावेलकर हे प्रभाग क्रमांक पाचमधून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. लविना डिसोझाही प्रभाग चौदामधून पुन्हा निवडणुकीस उभ्या राहिल्या आहेत. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांच्या पत्नी व माजी नगरसेविका नॅनी डिसोझा यांनी प्रभाग सतरामधून अर्ज दाखल केला आहे. प्रभाग सतरामधून जुझे फिलिप डिसोझा यांचे बंधू पास्कॉल निवडून आले होते. मात्र कोविडने त्यांचे निधन झाले होते. माजी नगरसेवक यतीन कामुर्लेकर, अरविंद शिंदे हे प्रभाग वीसमधून निवडणूक लढवत आहेत. माजी नगरसेवक राजन फळदेसाई हे पुन्हा प्रभाग बावीसमधून तर माजी नगरसेविका भावना नाणोस्कर या प्रभाग तेवीसमधून लढत आहेत.
सैफुल्ला खान यांचे तीन प्रभागांतून अर्ज
प्रभाग अकरा व सतरा हे महिलांसाठी आरक्षित असताना माजी नगराध्यक्ष सैफुल्ला खान यांनी या दोन्ही प्रभागांतून अर्ज दाखल केल्याने चर्चा होत आहे. मात्र मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिकेवर अंतिम निवाडा देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रभाग आरक्षणात बदल केल्यास आपण अकरा किंवा सतरा प्रभागातून निवडणूक लढवू शकू, यासाठी सैफुल्ला खान यांनी ही युक्ती केली आहे. काहीच बदल झाला नाही तर अर्ज फेटाळले गेले तरी काहीच नुकसान होणार नाही. त्यांनी आपला तिसरा अर्ज प्रभाग बारातून भरला आहे.