दरोड्यातील तिसरा संशयित गजाआड

दाबोळीतील बार्ज व्यावसायिकाला लुटल्याचे प्रकरण; सूत्रधार बेपत्ता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th March 2021, 11:46 pm
दरोड्यातील तिसरा संशयित गजाआड

वास्को/पणजी : दाबोळी येथील बार्ज व्यावसायिक प्रमोद देसाई (६५) यांच्या घरात घुसून त्यांना बांधून ठेवून दरोडा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी विशाल आहुजा या तिसऱ्या संशयिताला शनिवारी सकाळी ६.३० वा. पणजीतील कॅसिनोजवळून अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर-ठाणे (महाराष्ट्र) येथील सुनील मोरे व सूरज मारुती कांबळी यांना शुक्रवारीच अटक केली आहे. दरम्यान, या टोळीचा म्होरक्या डॉ. संजय वर्मा याचा शोध जारी आहे. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देसाई हे दाबोळीतील फातिमा कॉलनीत राहतात. कॉलनीपासून जवळच त्यांचे हॉटेल आहे. साधारण सहा-सात दिवसांपूर्वी डॉ. वर्मा हा त्यांच्या हॉटेलमध्ये उतरला होता. हॉटेलमध्ये खोलीचे आरक्षण करताना त्याने देसाई यांच्याशी मैत्री केली. तसेच गोव्यात विविध ठिकाणी आयुर्वेदिक शिबिरे घेणार असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर दोन दिवस डॉ. वर्मा हॉटेलमध्ये आलाच नाही. देसाई यांनी चौकशी केली असता, त्याने शिबिरे घेत असल्याचे सांगितले होते.
पोलिस तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी अचानक डॉ. वर्मा याने देसाई यांना फोन केला व भेटण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले. मात्र, देसाई यांनी घरी ते एकटाच असल्याने सायंकाळी येण्यास सांगितले. तरीही डॉ. वर्मा कारने दुपारीच घरी आला. त्याच्यासोबत आणखी तिघेजण होते. बंगल्यात शिरताच त्यांनी देसाई यांचे हातपाय बांधले आणि एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. मात्र, तेवढे पैसे नसल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी घरातील किमती वस्तू देण्यास सांगितले व त्यांच्याकडून ७ हजार रुपयांची रोकड आणि १ लाख २० हजार रुपयांचा मोबाईल घेतला. तसेच चार धनादेशांवर बळजबरी स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यांच्या क्रेडिट कार्डचा गुप्त क्रमांकही घेतला. हा एेवज घेतल्यानंतर तिघेजण बाहेर पडले व एकट्याला त्यांच्या पाळतीवर ठेवले होते.
कर्मचारी फयादमुळे सापडला संशयित
वरील घटनेच्या वेळी हॉटेल कर्मचारी फयाद कुंदगोळे घटनास्थळी आला. त्याने पाळत ठेवणाऱ्या संशयिताकडे देसाईंची चौकशी केली. तेव्हा त्याने आत बैठक सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे फयादला संशय आला. त्याने आजूबाजूच्या लोकांना तातडीने बोलावून पाळत ठेवणाऱ्या संशयितास पकडून ठेवले. त्यानंतर देसाई यांच्या पत्नीने गस्तीवरील पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने फातिमा कॉलनीत येऊन त्या संशयिताला पकडले चौकशी केली असता, त्याचे नाव सुनील मोरे असल्याचे उघड झाले.
दरम्यान, हा सर्व प्रकार विचित्र वाटत असला तरी त्यामागे काहीतरी व्यवहार दडलेले असण्याची शक्यता आहे. वास्को पोलिसांनी या प्रकरणी सध्या दरोड्याचा गुन्हा नोंद केला आहे. संशयितांकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांची जलद कामगिरी
- संशयित सुनील मोरेच्या चौकशीनंतर अन्य तिघांना पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक नीलेश राणे यांनी विविध पथके तयार केली. शोधकामाला आरंभ झाल्यावर शुक्रवारी सायंकाळी सूरज कांबळी याला पणजी बसस्थानकावरून पकडण्यात आले. तो बसने मुंबईला जाण्याच्या तयारीत होता.
- सूरज कांबळीकडे चौकशी केली असता त्याने इतर संशयितांची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे शाेध घेतला असता, शनिवारी सकाळी साडेसहा वाजता तिसरा संशयित विशाल आहुजा हा पणजीच्या एका कॅसिनोजवळ सापडला.

हेही वाचा