निवडणुकांच्या रिंगणात ४२३ उमेदवार

७७ जणांची माघार; पाच उमेदवार बिनविरोध

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th March 2021, 11:44 pm
निवडणुकांच्या रिंगणात ४२३ उमेदवार

पणजी : अर्ज मागे घेण्याच्या शनिवारच्या दिवशी ७७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तसेच पाच उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने ४२३ उमेदवार निवडणुकांच्या प्रत्यक्ष रिंगणात राहिले आहेत.
राज्यातील डिचोली, वाळपई, पेडणे, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा, काणकोण या सहा पालिका, पणजी महानगरपालिका तसेच साखळी पालिकेतील प्रभाग नऊ, पंचायतींतील २२ प्रभाग आणि जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी सादर झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी झाली होती. त्यात ५०५ अर्ज वैध ठरले होते. शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ७७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर वाळपई पालिकेतील प्रभाग आठ, म्हाऊशी पंचायतीतील प्रभाग दोन, भिरोंडा पंचायतीतील प्रभाग तीन, रिवण पंचायतीतील प्रभाग सात आणि चिखली पंचायतीतील प्रभाग दोनमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
सहा पालिकांपैकी डिचोलीत आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे ६८, वाळपईत दहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे २३, पेडण्यात आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे ३७, कुंकळ्ळीत एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने तेथे ६६, कुडचडे-काकोडा येथे ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे ४८, तर काणकोणमध्ये ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
साखळी पालिकेच्या प्रभाग नऊमध्ये एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने तेथे दुरंगी लढत होईल. नावेलीत तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने तेथे चौरंगी लढत होणार आहे. तर पंचायत पोटनिवडणुकांत १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
पाच पालिकांसाठी ५१८ जणांचे अर्ज
म्हापसा, मडगाव, केपे, सांगे आणि मुरगाव या पाच पालिकांतील निवडणुकांसाठी ५१८ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. म्हापसा पालिकेसाठी ११६, मडगावसाठी १२८, केपेसाठी ७३, सांगेसाठी ४६, तर मुरगाव पालिकेसाठी १५५ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. या अर्जांची सोमवारी छाननी होणार असून, मंगळवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असणार आहे.      

हेही वाचा