वन्य प्राणी, पक्षी बंदिस्तप्रकरणी पाच जणांना न्यायालयीन कोठडी


06th March 2021, 11:39 pm

वन्य प्राणी, पक्षी बंदिस्तप्रकरणी पाच जणांना न्यायालयीन कोठडी


प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : दक्षिण गोवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वार्का येथील वेलोरिअन्स बाय द रिव्हर या ओपन हॉलमध्ये छापा मारून बंदिस्त ठेवलेल्या वन्य प्राणी व पक्षांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी हॉलमधील पाच कर्मचाऱ्यांना वन अधिकाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने सर्व संशयितांना १४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

वार्का येथील हॉलमध्ये पक्ष्यांना व प्राण्यांना अवैधरीत्या बंदिस्त करून ठेवण्यात आल्याची माहिती मडगाव वन कार्यालयाला मिळाल्यानंतर केपेचे उपजिल्हा वनअधिकारी विशाल सुर्वे, भरारी पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश नाईक यांनी दक्षिण गोवा उपवनसंरक्षक अनिल शेटगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हॉलवर छापा मारला. यावेळी सागरी घार, मलबार खार, काळी घार, विविध प्रकारचे पोपट, मैना असे सुमारे २९ प्राणी व पक्षी बंदिस्त करण्यात आल्याचे आढळून आले. या पशू-पक्ष्यांची हाताळणी करणाऱ्या हॉलवरील कर्मचारी नागराज आचारी, दिनेश कुमार, समीर आयंद, सोमा कंदुलना व प्यारी केरकट्टा या संशयितांना अटक करण्यात आली. मडगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात संशयितांना हजर केले असता, सर्वांना १४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हॉल मालकाचा शोध सुरू आहे. बंदिस्त पशू-पक्ष्यांना जंगल परिसरात सोडून देण्यात आले.

हेही वाचा