बार्देश तालुक्यातील तीन प्रभागांत आठ उमेदवार रिंगणात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th March 2021, 11:23 pm

म्हापसा : बार्देश तालुक्यातील ओशेल, वेर्ला-काणका व बस्तोडा या तीन पंचायतींच्या तीन प्रभाग पोटनिवडणुकीसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वेर्ला-काणकातून आल्टन डिसोझा यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ओशेलमध्ये थेट तर वेर्ला-काणका व बस्तोडामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
ओशेल शिवोली पंचायत प्रभाग सातमधून प्रवीण कोचरेकर व रामा परब हे निवडणूक लढत आहेत. हा प्रभाग ओबीसी राखीव आहे. वेर्ला काणका प्रभाग सहामधून माजी सरपंच ख्रि. मिल्टन मार्कीस यांची मुलगी निकॉल मार्कीस, झेकारीयस मेंडीस व माजी सरपंच मोहन दाभाळे हे निवडणूक लढवित आहेत. हा प्रभाग खुल्या गटासाठी आहे. बस्तोडा पंचायत प्रभाग चारमधून मेघा गोवेकर, सोनिया साळगावकर व रिमा मोरजकर या निवडणूक लढवित आहेत. हा प्रभाग महिला राखीव आहे.
दरम्यान, ओशेल पंचायत प्रभाग चार मध्ये ३१७ मतदार आहेत. वेर्ला काणका पंचायत प्रभाग सहामध्ये ६४४ मतदार आहेत. तर बस्तोडा पंचायत प्रभाग चारमध्ये ५१० मतदार आहे. येत्या २० रोजी होणार्‍या पोटनिवडणूक मतदानावेळी वरील उमेदवारांचे भवितव्य या मतदारांच्या हाती आहे.
या तिन्ही प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून सेंड्री डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीसंबंधित प्रश्न किंवा मुद्दे ऐकून घेण्यासाठी त्या दर सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १२ वा. म्हापसा संयुक्त मामलेदार - १ यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील, असे निर्वाचन अधिकार्‍यांनी कळविले आहे.