भाजपने दत्तप्रसादना हटवले!

प्रवक्तेपद घेतले काढून; तानावडेंचा आदेश, जबाबदाऱ्यांच्या फेरवाटपाचे कारण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th March 2021, 12:21 am
भाजपने दत्तप्रसादना हटवले!

पणजी : पणजी महानगरपालिका (मनपा) निवडणुकीत भाजपने समर्थन दिलेल्या पॅनेलला आक्षेप घेत, संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंसह मुख्यमंत्र्यांवर खापर फोडलेल्या दत्तप्रसाद नाईक यांना भाजपने शुक्रवारी प्रवक्तेपदावरून हटवले.
प्रदेश भाजपमधील जबाबदाऱ्यांचे फेरवाटप करण्यात आले असून दत्तप्रसाद नाईक यांना प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. पण, नाईक यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळेच त्यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा पणजी, ताळगाव परिसरात सुरू आहे.
पणजी मनपा निवडणुकीसाठी आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी जाहीर केलेल्या पॅनेलला प्रदेश भाजपने समर्थन दिलेले आहे. तरीही हे पॅनल भाजपचे नसून खासगी असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी दत्तप्रसाद नाईक यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना केला होता. मनपा निवडणुकीत आपण केवळ मूळ भाजप उमेदवारांनाच मदत करू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. अपक्ष म्हणून उमेदवारी सादर केलेल्या मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर पक्षातील नाराज नेत्यांची समजूत काढली जाईल. तरीही एखाद्याने पक्षाची शिस्त मोडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दोन दिवसांपूर्वीच तानावडे यांनी मडगाव येथील कार्यक्रमात बोलताना दिला होता. त्यानंतर शुक्रवारी दत्तप्रसाद नाईक यांना प्रवक्तेपदावरून हटविण्यात आल्याने पक्षाची शिस्त मोडल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच पणजी व ताळगावातील जनतेत सुरू आहे.
सिद्धार्थ, उत्पलवर कारवाई नाही!
दत्तप्रसाद नाईक यांच्याप्रमाणेच प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर, उत्पल पर्रीकर यांच्यावरही भाजपकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, कुंकळ्येकर आणि उत्पल यांनी पक्षविरोधी भूमिका घेतलेली नाही किंवा बंडखोरीची भाषा केलेली नाही. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होणार नाही, अशी माहिती पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने दिली.