काँग्रेस-भाजपात जातीय वाकयुद्ध

दत्तप्रसादवरून चोडणकर-मांद्रेकर आमनेसामने

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th March 2021, 12:16 am
काँग्रेस-भाजपात जातीय वाकयुद्ध

पणजी : भाजपने दत्तप्रसाद नाईक यांना प्रवक्तेपदावरून हटवल्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्यात जातीय वाक् युद्ध सुरू झाले आहे. दत्तप्रसादना प्रवक्तेपदावरून हटवल्यामुळे भाजप जातीवादी पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. तर, पक्षांतर्गत पुनर्रचनेला जातीय वळण लावणे हास्यास्पद असल्याचा निशाणा भारतीय युवा मोर्चाचे (भाजयुमो) अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी साधला.
दत्तप्रसाद नाईक यांना प्रवक्तेपदावरून हटवणे आणि आपल्या नेत्यांचा बचाव करणे यातून भाजपचे जातीवादी राजकारण लक्षात येते. नाईक यांच्यासारख्या बहुजन समाजातील नेत्याला प्रवक्तेपदावरून हटवून भाजपने बहुजन समाजावर हल्ला केला आहे. या प्रकरणातून भाजप बहुजन समाजाच्या नेत्यांचा केवळ राजकारणासाठी वापर करून घेत असल्याचेच सिद्ध झाले आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी सोशल मीडियाद्वारे केला.
दरम्यान, चोडणकर यांच्या आरोपांना ‘भाजयुमो’चे अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनीही उत्तर दिले. प्रदेश काँग्रेसच्या दोनवेळा राजीनामा दिलेल्या अध्यक्षांनी दत्तप्रसाद नाईक यांच्याबाबत केलेले ट्वीट हास्यास्पद आहे. भाजपच्या अंतर्गत पुनर्रचनेला जातीय वळण देणाऱ्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे नेतृत्व अक्कलशून्य असल्याचे दाखवून दिले आहे. सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे, रितेश रवी नाईक यांच्यासारख्या भंडारी नेत्यांना बाजूला सारून त्यांना पक्ष सोडण्यास का भाग पाडण्यात आले, धनगर समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नितीन पाटकर यांना युवा काँग्रेसच्या सरचिटणीस पदावरून का हटवण्यात आले, याची कारणे चोडणकर यांनी द्यावी आणि त्यानंतरच भाजपवर बोलावे, असा सल्ला मांद्रेकर यांनी दिला. स्वत:ची अकार्यक्षमता लपवण्यासाठी काँग्रेस नेहमीच जातीचे राजकारण पुढे करत आल्याची टीकाही त्यांनी केली.