ईडीचे ‘मनी एक्सचेंज’ आस्थापनांवर छापे

४४.३७ लाखांसह ९.५५ लाखांचे विदेशी चलन जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th March 2021, 12:15 am
ईडीचे ‘मनी एक्सचेंज’ आस्थापनांवर छापे

पणजी : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने हवाला प्रकरणी ‘मनी एक्सचेंज’च्या दोन आस्थापनांवर छापा टाकून ४४.३७ लाख रुपये रोख आणि ९.५५ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. ईडीने सेटे मारेस ग्लोबल फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नेमीचंद खेमराज फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मुंबई आणि गोव्यातील कार्यालयांसह एका संचालकाच्या घरावर छापे टाकून ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणावली येथील सेटे मारेस ग्लोबल फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड मनी एक्स्चेंज आस्थापन दररोज मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करत असल्याची माहिती गोवा विभागाच्या ईडीच्या अधिकाऱ्याला मिळाली होती. या माहितीची चौकशी केल्यानंतर संबंधित कंपनीच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करून मुंबईतील नेमीचंद खेमराज फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यात पाठवत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ईडीने २ मार्च रोजी मुंबईसह राज्यात बाणावली आणि कळंगुट येथील आस्थापनांवर छापा टाकला.

सेटे मारेस ग्लोबल फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या एका संचालकाच्या बाणावलीतील निवासस्थानावरही छापा टाकला. यावेळी ईडीने ४४.३७ लाख रुपये रोख आणि ९.५५ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. त्याचबरोबर लॅपटाप, मोबाईल तसेच इतर महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले आहे. ही कारवाई विदेशी चलन व्यवस्थापन कायदा १९९९ च्या कलम ३७ अंतर्गत करण्यात आली आहे.