उत्पल यांची अस्पष्ट भूमिका

उत्पल यांना सांतआंद्रे सारखा एखादा दुसरा मतदारसंघ दिला जाऊ शकतो किंवा मतदारसंघ उपलब्ध नाही असे कारण देऊन त्यांना पुढच्या निवडणुकीतून पुन्हा बाहेर ठेवले जाऊ शकते.

Story: अग्रलेख |
05th March 2021, 12:06 am
उत्पल यांची अस्पष्ट भूमिका

उत्पल पर्रीकर हे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीतून उत्पल पर्रीकर यांनी निवडणूक लढवावी असे अनेकांना वाटले, पण भाजपतीलच काही जणांनी कारस्थान करून त्यांना डावलले. म्हापसा मतदारसंघात फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली गेली, पण पणजीत उत्पल यांच्या बाबतीत वेगळा न्याय झाला. तेव्हापासून भाजपपासून दुखावलेला काही कट्टर कार्यकर्त्यांचा एक गट उत्पल यांनाच आपला नेता मानत आहे. पोटनिवडणुकीत उत्पल यांचे नाव उमेदवारी मागणाऱ्यांच्या यादीत असतानाही त्यांना डावलले गेले यावरून बाबूश मोन्सेरात यांना पणजीत मार्ग मोकळा करून देण्याचे कारस्थानही शिजले असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही कार्यकर्ते बोलून दाखवतात. कारस्थानाची सगळी कल्पना उत्पल यांना आहे. पण ते पक्षाशी प्रामाणिक राहिले. नंतर पक्षाच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. असे असले तरीही उत्पल यांनी पक्षाच्या कामात सक्रियता दाखवली नाही. पणजीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले बाबूश मोन्सेरात यांना पक्षाने प्रवेश दिला तेव्हा उत्पल यांची राजकीय इच्छाशक्तीही कदाचित कमजोर झाली असावी. मोन्सेरात हे भाजपासोबत राहिले तर पुढे भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढणे शक्य नाही हे उत्पल यांना कळले असेल. मोन्सेरात यांचा पणजी, ताळगाव, सांताक्रुझ या मतदारसंघांवर प्रभाव आहे. त्यामुळे भाजपचे नेते बाबूश यांनाच भाजपच्या उमेदवारीसाठी प्राधान्य देतील. उत्पल यांना सांतआंद्रे सारखा एखादा दुसरा मतदारसंघ दिला जाऊ शकतो किंवा मतदारसंघ उपलब्ध नाही असे कारण देऊन त्यांना पुढच्या निवडणुकीतून पुन्हा बाहेर ठेवले जाऊ शकते. पण अशा वेळी बंडखोरी करण्याची वेळ आलीच तर पणजीसारख्या मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांसोबत आतापासूनच राहणे गरजेचे ठरेल.
मनोहर पर्रीकर १९९४ पासून २०१७ च्या पोटनिवडणुकीपर्यंत पणजीचे आमदार म्हणून निवडून आले. मध्यंतरी संरक्षण मंत्री असताना सिद्धार्थ कुंकळ्येकर हे पणजीचे आमदार राहिले, पण पर्रीकरांना पणजीकरांनी स्वीकारले होते. मोन्सेरात यांना पणजीकरांनी एकदा नाकारल्यानंतर पोट निवडणुकीत ते पुन्हा उतरले. त्यावेळी मात्र पणजीकरांनी सिध्दार्थ कुंकळ्येकर यांचा पर्याय नाकारला आणि मोन्सेरात यांना पणजीत प्रवेश दिला. त्यावेळी उत्पल यांना पक्षाने उमेदवारी दिली असती तर आज मोन्सेरात हे सत्तेबाहेर असते आणि आमदारही नसते.
उत्पल पर्रीकर यांचा पाठिंबा काही बिगरभाजप पुरस्कृत उमेदवारांना आहे हे सर्वश्रूत होते, पण सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि दत्तप्रसाद नाईक यांच्यासोबत ते उघडपणे पणजीत उमेदवारांना पाठिंबा देताना अजूनपर्यंत दिसलेले नाहीत. गेले काही दिवस त्यांच्या नावाची चर्चा असल्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजून कुणाला पाठिंबा दिलेला नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. वीस पंचवीस वर्षे पक्षासाठी काम केलेल्या लोकांना उमेदवारी दिली नाही याविषयी ज्या हरकती आहेत त्या मी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना सांगितल्या आहेत असे म्हणून उत्पल यांनी मवाळ भूमिका घेतली. चांगल्या उमेदवारांना मी वैयक्तिक पातळीवर पाठिंबा देईन असे त्यांचे म्हणणे आहे. पण त्यांची ही भूमिका प्रखर नाही. पक्षाविरुद्धही नाही आणि पक्षासोबत आहे असे दाखवत नाहीत. त्यांनी मधला मार्ग म्हणून आपल्या काही कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे. आता सगळीच सूत्रे मोन्सेरात यांच्या हाती दिली तर पुढे आपल्याला त्याचा त्रास होईल याची जाणीव त्यांना असल्यामुळे आपल्या काही अवघ्याच कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी ते वैयक्तिक पध्दतीने उमेदवारांना पाठिंबा देतील असे आता स्पष्ट झाले आहे. शेवटी ही कृतीही पक्ष शिस्त मोडण्याचीच आहे. त्यांनी भाजप पुरस्कृत गटाला डावलून जर इतर उमेदवारांना पाठिंबा दिला तर ती पक्षविरोधी कृती ठरणार आहे. त्यापेक्षा पूर्वीच पक्षाशी बोलून आपल्या काही कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित ते फलदायी ठरले असते.
उत्पल पर्रीकर हे साध्या स्वभावाचे असल्यामुळे पक्षानेही पॅनल निश्चित करताना कल्पना दिलेली नसेल, त्यामुळेही सध्याचा गोंधळ सुरू असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण भाजप पुरस्कृत पॅनलमध्ये नसलेले भाजपचे सक्रिय पदाधिकारी असलेले आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी जेव्हा पक्षाच्या पॅनलच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरतात तेव्हा नक्कीच त्यांना आतून उत्पल, कुंकळ्येकर आणि दत्तप्रसाद नाईक यांचा पाठिंबा असेल यात शंका नाही. असे असतानाही उत्पल पर्रीकर मात्र उघडपणे भूमिका घेऊ शकत नाही हे आश्चर्यकारक आहे. उत्पल जर जाहीर पत्रकार परिषद घेऊन बोलले नसते तर झाकली मूठ सव्वालाखाची ठरली असती. पण पत्रकार परिषद घेऊनही उत्पल पर्रीकर हे स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाहीत तर त्यांच्यामागे उभे राहू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनाही ते अधांतरी ठेवत आहेत हेही यातून अधोरेखित होते.