पणजीतील फूट

भाजपचे आमदार असूनही मोन्सेरात यांना आव्हान देणाऱ्यांना जर पक्ष पाठीशी घालत असेल, तर शिस्तीचा पक्ष म्हणून ख्याती असलेल्या भाजपची कार्यकर्त्यांमध्ये असलेली भीती नष्ट होईल.

Story: अग्रलेख |
04th March 2021, 12:14 am
पणजीतील फूट

..................................................................................................

पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार बाबूश मोन्सेरात आणि भाजप पुरस्कृत पॅनेलच्या विरोधात दुसरे पॅनेल उतरले आहेच; शिवाय भाजपच्याच पदाधिकाऱ्यांकडून पणजीत काही ठिकाणी मोन्सेरात यांच्या उमेदवारांच्या विरुद्ध उमेदवार उभे केले जात आहेत. या सगळ्या घडामोडी होत असताना पक्षाचे वरिष्ठ नेते गप्प आहेत. त्यामुळे पणजीत निर्माण झालेले भाजप विरुद्ध भाजप चित्र आणखी गडद होत आहे. भाजपमधील अन्य काही पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, मंडळाचे सदस्यही निवडणुकीत उतरत आहेत. बाबूश मोन्सेरात यांनी पाठिंबा दिलेले पॅनेल आणि त्यांच्याच विरोधात उभे असलेले भाजपचे पणजी मतदारसंघातील पदाधिकारी यांच्यामुळे पक्ष केडरच्या मतांचीही विभागणी होऊ शकते याची कुणकुण मोन्सेरात यांना लागल्यामुळे पक्षाच्या नेतृत्त्वावर तेही नाराज आहेत. पक्षाने हस्तक्षेप केला नाही तर संपूर्ण महापालिका ताब्यात घेण्याचे मोन्सेरात यांचे स्वप्न भंग होऊ शकते. अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना धक्का बसू शकतो आणि दुसऱ्या पॅनेलचे उमेदवार महापालिकेवर निवडून येऊ शकतात.

मोन्सेरात यांनी आपल्या वीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक पक्ष बदलले. कितीतरी वेळा त्यांनी पदे मिळवण्यासाठी पक्षांतर केले. कुठल्याही पक्षात ते स्थीर राहू शकले नाहीत. युगोडेपा, भाजप, काँग्रेस अशा बहुतांश पक्षांमध्ये त्यांनी प्रवेश घेऊन ज्याची सत्ता असते तिथे राहण्याचा प्रयत्न केला. अनेक वाद, आरोप, गंभीर गुन्हे नोंद होऊनही ते आमदार आहेत आणि विशेष म्हणजे ते तुरुंगात नाहीत. आपण आमदार होऊन सत्तेत रुळल्यानंतर पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना त्यांनी राजकारणात आणले. ताळगावच्या आमदार म्हणून त्या दुसऱ्यांदा निवडूनही आल्या आणि सध्या मंत्री आहेत. मोन्सेरात यांनी आपल्या वाट्याला आलेले मंत्रिपदही जेनिफर यांना दिले. आता आपल्या मुलाला त्यांनी राजकारणात उतरवले आहे. महापालिका निवडणूक रिंगणात रोहित मोन्सेरात आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना तसेच दिवंगत मनोहर पर्रीकर हे पणजीचे आमदार असतानाही पणजी महापालिकेवर आपली सत्ता स्थापन करणारे आंतानासियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी गेल्या वीस वर्षात अनेक डावपेच खेळून पणजी, सांताक्रुझ, ताळगाव अशा तिन्ही मतदारसंघांची आमदारकी मिळवली. सध्या ते पणजीत भाजपचे आमदार आहेत. ते आल्यापासून पणजीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडली आहे. मोन्सेरात हे मंत्री नसले तरीही त्यांच्याजवळ जाणाऱ्या व्यक्तीचे काम करण्यासाठी ते प्रयत्न करतात; किंबहुना अनेकदा काही कार्यकर्त्यांच्या घरीही ते पोहोचतात. मतदारांमध्ये नम्र होऊन राहत असल्यामुळे पणजीत मोन्सेरात यांचा चाहतावर्ग वाढत आहे. अशा मोक्याच्या क्षणी भाजपचेच पदाधिकारी मोन्सेरात यांना अपशकून करण्यासाठी मेहनत घेत आहेत, हेच महापालिकेच्या निवडणुकीतून स्पष्ट दिसते.
 माजी आमदार आणि भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर, उत्पल पर्रीकर आणि प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर केल्यामुळे मोन्सेरात यांच्यावर नाराज असलेले अनेक कार्यकर्ते त्यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना आव्हान देत आहेत. पणजीतील हे चित्र मोन्सेरात यांना अस्वस्थ करणारे आहेच; शिवाय उमेदवारांची गर्दी झाली तर मतांची विभागणी होऊन भाजप केडरचा मतदार मोठ्या प्रमाणात विभागला जाऊ शकतो. त्याचा फटका मोन्सेरात यांच्या उमेदवारांना बसू शकतो, अशी भीती त्यांच्या पॅनेलला आहे. कुंकळ्येकर यांना मोन्सेरात यांनी पराभूत केले होते. दिवंगत मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना कुंकळ्येकर यांची चलती होती. पण, त्या काळात भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्तेही दुखावले गेले हेही सत्य आहे. मागील पोट निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांना डावलून कुंकळ्येकर यांना तिकीट दिले गेले. पण, त्याचा फायदा झाला नाही. उत्पलना भविष्यात पणजीतून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. दत्तप्रसाद नाईक हे ताळगावमधून विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. हे तिन्ही नेते पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना जवळचे असल्यामुळे समेट घडवणेही पक्षाला सध्या कठीण झाले आहे. हे नेते मोन्सेरात यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकत नाहीत. पणजी हा भाजपचा गड असल्यामुळे तो शाबूत ठेवण्यासाठी मोन्सेरात यांच्यावर भरोसा ठेवायचा नाही, असे या नेत्यांना वाटते. उद्या मोन्सेरात दुसऱ्या पक्षात गेले तर मूळ भाजपच्या लोकांनी काय करायचे, असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे. त्यासाठी आता निवडणुकीच्या वेळी पर्रीकरांचे व्हीजन पुढे नेण्याचे निमित्त या नेत्यांना सुचले आहे. भाजप पुरस्कृत मोन्सेरात गटाच्या पॅनेलला आव्हान देणाऱ्यांवर पक्ष कारवाई करेल का? पक्षाच्या शिस्तीपासून आणि कारवाईपासून या नेत्यांचा बचाव होत आहे का? भाजपचे आमदार असूनही मोन्सेरात यांना आव्हान देणाऱ्यांना जर पक्ष पाठीशी घालत असेल तर शिस्तीचा पक्ष म्हणून ख्याती असलेल्या भाजपची कार्यकर्त्यांमध्ये असलेली भीती नष्ट होईल. भाजपने आताच हे सगळे रोखले नाही तर पणजीत सुरू झालेले भाजप विरुद्ध भाजपचे चित्र इतर ठिकाणीही दिसू लागेल यात शंका नाही.