Goan Varta News Ad

उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd March 2021, 11:48 Hrs
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

पणजी : राज्यातील सहा पालिकांसाठी आतापर्यंत २८९, पणजी मनपासाठी ७४, साखळी पालिकेच्या प्रभाग नऊमधील पोटनिवडणुकीसाठी ३, पंचायत पोटनिवडणुकांसाठी ४०, तर जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी एकूण ५ उमेदवारांचे अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे सादर झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी गुरुवारचा अंतिम दिवस असल्यामुळे अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.
आतापर्यंत डिचोली पालिकेसाठी ५५, वाळपईसाठी ३२, पेडणेसाठी ३८, कुंकळ्ळीसाठी ७४, कुडचडे-काकोडासाठी ५० आणि काणकोणसाठी ४० असे एकूण २८९ अर्ज सादर झाले आहे. या पालिकांसाठी मंगळवारी १३२, तर बुधवारी १२२ उमेदवारांनी अर्ज सादर केले. प्रभाग फेररचना आणि आरक्षणावरून उच्च न्यायालयाने मडगाव, मुरगाव, सांगे, केपे आणि म्हापसा येथील निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवल्या आहेत. त्यामुळे अकरापैकी केवळ पाचच पालिकांच्या निवडणुका २० मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.
दोन्ही जिल्ह्यांतील वीस पंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी आतापर्यंत ४० अर्ज सादर झाले आहेत. उत्तर गोव्यातील पंचायतींसाठी २७ आणि दक्षिण गोव्यातील पंचायतींसाठी १३ अर्ज सादर झाले आहेत. पणजी मनपासाठी बुधवारी ३७ अर्ज सादर झाल्याने आतापर्यंतच्या अर्जांची संख्या ७४ झाली आहे. राजधानीतील राजकीय वातावरण तापत असल्यामुळे गुरुवारी त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
अर्ज सादर करण्यासाठी गुरुवारचा अखेरचा दिवस आहे. शुक्रवारी अर्जांची छाननी होईल. शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. २० मार्च रोजी निवडणुकांसाठी मतदान होईल, तर २२ मार्च रोजी निकाल लागेल.