‘डीडीएसएसवाय’धारकांंवर यापुढे व्हिक्टरमध्येही मोफत उपचार

पुढील महिन्यापासून बालकांवरही हृदय शस्त्रक्रिया : दीक्षित


03rd March 2021, 11:40 pm
‘डीडीएसएसवाय’धारकांंवर यापुढे व्हिक्टरमध्येही मोफत उपचार

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना अल्कॉन व्हिक्टर ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक व्हिक्टर अल्बुकर्क. सोबत डॉ. एम. डी. दीक्षित.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : विविध औषध-उपचार क्षेत्रातील कन्सल्टंट डॉक्टरांची उपलब्धता, २४ तास व सातही दिवस हृदयसमस्यांवर उपचारांसाठी सज्ज असे व्हिक्टर हॉस्पिटल आहे. आपल्या मोठ्या डॉक्टरांच्या पथकाच्या जोरावर हॉस्पिटलमध्ये समाजातील सर्व स्तरातील रुग्णांवर उपचार केले जातात. याचसाठी दीनदयाळ सामाजिक सुरक्षा योजनाचे (डीडीएसएसवाय) कार्डधारक असलेल्या नागरिकांना हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारसेवा दिली जात आहे, असे अल्कॉन व्हिक्टर ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक व्हिक्टर अल्बुकर्क यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. एम.डी. दीक्षित उपस्थित होते.
हॉस्पिटलविषयी अधिक माहिती देताना व्हिक्टर अल्बुकर्क म्हणाले, गोव्यातील पहिले, प्रतिथयश तसेच गत १७ वर्षे रुग्णसेवेत असलेले सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळख असलेल्या व्हिक्टर हॉस्पिटलमधील कार्डिओ-व्हस्कुलर विभागाचे आधुनुकीकरण करण्यात आले आहे. देशातील नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित रुग्णांना सल्ला-मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाले आहेत. डॉ. दीक्षित यांनी २५ हजारांहून अधिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. त्यांच्यासह वरिष्ठ हृदयरोग शल्यविशारद डॉ. शिवराम यांच्या उपलब्धतेमुळे रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील अनेक विक्रम नावावर असलेले डॉ. विनायाग पांडियनही या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाची जबाबदारी दोन वरिष्ठ फिजिशियन डॉ. रॉबर्ट डिकॉस्टा आणि डॉ. राजेश जवहेरनी सांभाळत असून येथे पूर्णवेळ इंटेन्सिविस्ट डॉक्टरांचे पथक रुग्णसेवेसाठी सज्ज आहे.
डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, हॉस्पिटलमध्ये शरीरास कमीतकमी छेद घेऊन करता येणारी बायपास शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध झाली आहे. पारंपरिक उपचारपद्धतीत रुग्णाची पूर्ण छाती फाडावी लागत असे. पण आता या सुविधेमुळे रुग्णाच्या छातीवर छोटेसे छिद्र पाडूनही शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रियेच्या तुलनेत या मिनिमली इन्वेझिव सर्जरीचे परिणाम व यशाची टक्केवारीही चांगली असून रुग्ण लवकर बरा होतो. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये लवकरच टीएव्हीआय म्हणजेच ट्रान्स-एरॉटिक वॉल्व इम्प्लान्टेशन शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध होत आहे. या सुविधेमुळे हृदयाच्या झडपा बदलण्यासाठी ओपन हार्ट शस्त्रक्रियेची गरज राहणार नसून केवळ मांडीवर छोटासा छेद (स्मॉल रॅडियल फेमोरल इन्सिजन) करून हृदयाची झडप बदलता येणार आहे.
बालरोग हृदय शस्त्रक्रिया सुविधाही लवकरच
व्हिक्टर हॉस्पिटलमधील कार्डिओ व्हस्कुलर सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, आगामी काही महिन्यांत बालरोग हृदय शस्त्रक्रिया सुविधाही सुरू करण्याचा हॉस्पिटलचा प्रयत्न आहे. प्राप्त सांख्यिकीनुसार, दर महिन्याला गोव्यातील सरासरी ५ बालरुग्णांसह त्यांचे कुटुंबीय हृदयसमस्येवर उपचारांसाठी राज्याबाहेर प्रवास करत असतात. आता व्हिक्टर हॉस्पिटलमधील या सेवेमुळे मुलांमधील हृदयसमस्यांवर उपचारांसाठी राज्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही.